पुणेकर मुंगीच्या गतीनं नव्हे, आता सुसाट सुटायचं, वर्दळीच्या रस्त्यासाठी मेगा प्लॅन तयार, नेमकं काय होणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Traffic: पुण्याचं पश्चिम प्रवेशद्वार मानला जाणारा चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. आता याच 2 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 203 कोटींचा मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे.
पुणे : पश्चिम पुण्याच्या प्रवेशद्वारावर दररोज निर्माण होणाऱ्या भयाण वाहतूक कोंडीपासून पुणेकरांना अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. चांदणी चौक ते भूगाव या दोन किलोमीटरच्या अरुंद रस्त्यामुळे वर्षांनुवर्षे वाहनचालक त्रस्त होते. या कोंडीचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी पुणे महापालिकेने तब्बल 203 कोटी रुपयांचा व्यापक प्रकल्प हाती घेतला असून, यात उड्डाण पूल, भुयारी मार्ग आणि रस्त्याच्या व्यापक रुंदीकरणाचा समावेश आहे.
भूगाव-भूकूम परिसरात झपाट्याने वाढलेल्या नागरीकरणामुळे दररोज लाखो वाहने या भागातून पुण्यात प्रवेश करतात. तसेच या मार्गावरून हिंजवडी, घोटावडे, पिरंगुट, मुळशी आणि कोकण पट्ट्यात जाणाऱ्या वाहनांचीही संख्या वेगाने वाढत आहे. चांदणी चौकातील नव्याने तयार झालेल्या रस्त्याचा फायदा पुढे जाताना अरुंद मार्गामुळे कमी होतो आणि पुन्हा कोंडीत अडकावे लागते. नियमानुसार हा मार्ग 60 मीटर रुंदीचा असायला हवा पण प्रत्यक्षात ती केवळ 10.30 मीटर असल्याने या समस्येचे निराकरण अत्यावश्यक झाले होते.
advertisement
नगरपालिकेच्या अंदाज समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रकल्पास मंजुरी दिली असल्याची माहिती प्रकल्प विभाग प्रमुख दिनकर गोवारे यांनी दिली. आवश्यक जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू असून 85 टक्के जमीन हस्तांतरित झाल्यावर प्रत्यक्ष कामाला वेग दिला जाणार आहे.
advertisement
या मार्गावरील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे 430 मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर. त्यातील 120 मीटर भाग आस्तीती स्ट्रक्चर स्वरूपात असेल. 23.2 मीटर रुंदी असलेल्या या सेपरेटरसाठी अंदाजे 27 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चांदणी चौकातून पुढे उतार असल्याने आणि बावधनकडे जाणाऱ्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन हा सेपरेटर उपयुक्त ठरणार आहे.
दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 870 मीटरचा उड्डाण पूल. त्यातील 544 मीटर भाग आरसीसीचा असेल. 23.2 मीटर रुंदीच्या या पुलासाठी 82 कोटी रुपये खर्च येणार आहे. पूल तयार झाल्यानंतर चांदणी चौक-भूगाव मार्गावरील प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा वेग वाढणार असून, भूगाव-भूकूम परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 02, 2025 1:38 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर मुंगीच्या गतीनं नव्हे, आता सुसाट सुटायचं, वर्दळीच्या रस्त्यासाठी मेगा प्लॅन तयार, नेमकं काय होणार?


