150 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि 20 राज्यांचा सहभाग, पुण्यात हे प्रदर्शन पाहण्याची मोठी संधी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
भारतातील सर्वात मोठे आणि जागतिक दर्जाचे मानले जाणारे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन व बागायती हॉर्टीकल्चर प्रदर्शन यंदा सहाव्या वर्षी अधिक भव्य रूपाने पुणेकरांसाठी खुले झाले आहे.
पुणे: भारतातील सर्वात मोठे आणि जागतिक दर्जाचे मानले जाणारे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन व बागायती हॉर्टीकल्चर प्रदर्शन यंदा सहाव्या वर्षी अधिक भव्य रूपाने पुणेकरांसाठी खुले झाले आहे. वसू इव्हेंट यांच्या वतीने आयोजित हे प्रदर्शन 16 नोव्हेंबर पर्यंत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालय मैदानावर भरविण्यात आले असून देश- विदेशातील बागायती क्षेत्रातील तज्ञ, उद्योजक, शेतकरी, संशोधक आणि नर्सरी व्यवसायिक यांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
या प्रदर्शनात जगभरातील 12 देश आणि भारतातील 20 राज्यांतील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. बागायती क्षेत्रातील अत्याधुनिक नवकल्पना, फुलांचे नवे प्रकार, विविध वनस्पती, गार्डनिंग उपकरणे, प्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, तसेच सेंद्रिय शेतीविषयीचे मार्गदर्शन अशा विविध विषयांवरील माहिती आणि उत्पादने याठिकाणी पाहता येत आहेत. एकूण 150 पेक्षा जास्त स्टॉल्समुळे हे प्रदर्शन अधिक माहितीपूर्ण आणि आकर्षक आहे.
advertisement
हॉर्टीकल्चर, फ्लोरीकल्चर आणि नर्सरी क्षेत्रातील शेतकरी, होलसेलर, रिटेलर, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन 2018 पासून आयोजित केले जाते. देशभरातील बागायती व्यवसायाला चालना देणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल माहिती देणे आणि नर्सरी व फुलोत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सहावा वर्ष असल्याने यंदाचे आयोजन अधिक मोठे आणि आधुनिक स्वरूपात करण्यात आले आहे. बागायती क्षेत्रातील नवीन कामे, पर्यावरणपूरक साधने, इनडोअर–आउटडोअर डेकोरेटिव्ह प्लांट्स, तसेच छतावरील बाग, व्हर्टिकल गार्डनिंग यांसारखे आधुनिक ट्रेंड्सही येथे सादर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा अवलंब करावा, तसेच पाण्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आधुनिक पाणी बचत तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन, मायक्रो सिंचन योजनांची माहितीही प्रदर्शनात देण्यात येत आहे.
advertisement
पाण्याचा कार्यक्षम वापर, कमी खर्चात बागायती उत्पादन वाढवण्याचे मार्ग, तसेच हवामान बदलाच्या काळात टिकणाऱ्या वनस्पतींची माहिती तज्ज्ञ देत आहेत. या प्रदर्शनात युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील विविध देशांतून प्रतिनिधी आले आहेत. त्यांच्या कडून फुलांचे हायब्रिड प्रकार, प्रगत रोपे, उच्च उत्पादनक्षम वनस्पती, तसेच जागतिक बाजारपेठेतील मागणीबाबत माहिती दिली जात आहे. 10 देशांतील व्हिजिटर्समुळे हे प्रदर्शन अधिक आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
advertisement
वसू इव्हेंटचे वसंत रासने यांनी सांगितले की, यंदाच्या प्रदर्शनाचा उद्देश अधिकाधिक शेतकऱ्यांना फुलोत्पादन, नर्सरी आणि बागायती व्यवसायातील संधी उपलब्ध करून देणे हा आहे. 150 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि 20 राज्यांचा सहभाग या क्षेत्रातील वाढता उत्साह पाहिला मिळतो. घरगुती बागकाम करणाऱ्या नागरिकांपासून ते व्यावसायिक नर्सरी व्यवसायिकांपर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन माहितीचे केंद्र आहे. फुलांची नवीन वाणं, सजावटीच्या वनस्पती, बागायती उपकरणे, कुंड्या, खतांचे पर्याय, तसेच घर सजावटीसाठी लागणाऱ्या विविध सामग्रीचे प्रदर्शन येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हे प्रदर्शन 16 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले असून, पुणेकरांना जागतिक दर्जाचे बागायती ज्ञान, तंत्रज्ञान आणि सौंदर्य एका ठिकाणी पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 14, 2025 6:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
150 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि 20 राज्यांचा सहभाग, पुण्यात हे प्रदर्शन पाहण्याची मोठी संधी

