Team India : '4 वेळा शून्यवर आऊट झालो, मला टीममधून ड्रॉप करा', टीम इंडियाच्या स्टार ओपनरचा थेट निवड समितीला मेसेज!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
चार वेळा शून्यवर आऊट झाल्यानंतर मीच निवड समितीला मला टीममधून काढून टाकायला सांगितलं होतं, असा धक्कादायक खुलासा टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने केला आहे.
मुंबई : चार वेळा शून्यवर आऊट झाल्यानंतर मीच निवड समितीला मला टीममधून काढून टाकायला सांगितलं होतं, असा धक्कादायक खुलासा टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने केला आहे. प्रकाशझोतापासून कायमच लांब राहणाऱ्या या क्रिकेटपटूने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, यामध्ये त्याने त्याच्या क्रिकेट करिअरमधील चढ-उतारावर भाष्य केलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली विजय त्याच्या क्रिकेट करिअरबद्दल सविस्तरपण व्यक्त झाला आहे. तामिळनाडूसाठी पदार्पण करणं आपल्या करिअरसाठी मैलाचा दगड होता, भारतीय टेस्ट टीमची कॅप मिळाली तेव्हा मला खूप चांगलं वाटलं, असं मुरली विजय म्हणाला आहे.
मुरली विजयच्या करिअरची सुरूवात चांगली झाली नव्हती. विजय अंडर-22 मध्ये चार वेळा शून्यवर आऊट झाला होता, तेव्हा आपण क्रिकेट खेळण्याच्या लायक खरंच आहोत का? असा विचारही त्याच्या मनात आला होता. लागोपाठ 4 वेळा शून्यवर आऊट झाल्यानंतर मुरली विजयने निवड समितीला त्याला टीममधून काढायला सांगितलं, पण काही काळानंतर विजयने मोठे स्कोअर करायला सुरूवात केली आणि स्वत:ला सिद्ध केलं.
advertisement
अभिनव मुकुंदसोबत केलेली 462 रनची ओपनिंग पार्टनरशीप ही मुरली विजयची सर्वोत्तम खेळीपैकी एक होती. या कामगिरीमुळे 2008-09 साली मुरली विजयला गौतम गंभीरच्या ऐवजी टेस्टमध्ये संधी मिळाली. तरुवर कोहलीच्या युट्युब चॅनलवर मुरली विजयने त्याच्या क्रिकेटचा प्रवास सांगितला आहे.
मुरली विजयचा निवड समितीला मेसेज
'तामिळनाडूसाठी खेळणं माझ्यासाठी सगळ्यात मोठी उपलब्धी होती. जेव्हा मला कॅप मिळाली, तेव्हा मला वेगळंच वाटलं, मला यश काय असतं ते समजलं. मी अंडर-22 खेळताना 4 वेळा शून्य रनवर आऊट झालो होतो, तेव्हा आपण या लायकच नाही असं मला वाटलं होतं. कारण मी तेव्हा फार खेळलो नव्हतो आणि मला प्रोफेशनल लेव्हल क्रिकेटचा अनुभवही नव्हता. मला पहिल्यांदा संधी मिळाली तेव्हा मला ते संकट वाटलं. मी सिलेक्टर्सकडे गेलो आणि मला टीममधून काढा आणि दुसऱ्याला संधी द्या, अशी विनंती मी केली', असं मुरली विजय म्हणाला आहे.
advertisement
मुरली विजयला अखेर 2012-13 साली ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात पूर्ण टेस्ट सीरिज खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्याने सोनं केलं. मुरली विजयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये लागोपाठ दोनदा 150 रन केले. यानंतर 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही मुरली विजयची निवड झाली, त्या सीरिजमध्ये मुरली विजय भारताचा दुसरा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.
2023 साली मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मुरली विजयची आंतरराष्ट्रीय कारकिर्द 2008 साली सुरू झाली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या नागपूर टेस्टमध्ये मुरली विजयने गौतम गंभीरची जागा घेतली. मुरली विजय भारताकडून 61 टेस्ट, 17 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला.
view commentsLocation :
Chennai,Tamil Nadu
First Published :
December 09, 2025 4:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : '4 वेळा शून्यवर आऊट झालो, मला टीममधून ड्रॉप करा', टीम इंडियाच्या स्टार ओपनरचा थेट निवड समितीला मेसेज!


