Maharashtra Congress: बिहारच्या निकालानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसला मोठा धक्का, चिंता वाढली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी राजीनामा दिला आहे.
ठाणे : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दयानंद चोरगे यांनी आपल्या राजीनामा पत्रात ‘वैयक्तिक कारणांमुळे’ पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून त्यांच्या नाराजीची चर्चा काँग्रेसच्या स्थानिक वर्तुळात होत होती. अनेक निवडणुकांमध्ये त्यांना डावललं असल्याची खंत त्यांच्या मनात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पक्षात त्यांना अपेक्षित स्थान न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील असंतोषाची भावना होती.
advertisement
काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच चोरगे यांनी अनपेक्षितपणे राजीनामा जाहीर केला. बिहारमध्ये काँग्रेसला मिळालेल्या निकालांमुळे पक्षातील नाराजी अधिक तीव्र झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर चोरगे यांचा निर्णय केवळ वैयक्तिक नसून पक्षातील वाढत्या अंतर्गत नाराजीचे प्रतिबिंब असल्याची चर्चा जोर धरत आहे. दयानंद चोरगे हे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे प्रभावी नेतृत्व मानले जात होते. स्थानिक पातळीवर त्यांचा भक्कम जनसंपर्क असून संघटनात्मक कामात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे येथील काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
advertisement
काय म्हटले आहे पत्रात?
विषय :- ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्य राजीनामा मंजूर करण्याबाबत
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास विनंतीपूर्वक कळविण्यात येते की, ठाणे जिल्हा ग्रामीण कॉँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून आता पर्यंत कार्यरत होतो. माझ्या वैयक्तिक कारणात्सव मी जिल्हाअध्यक्ष पदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा देत आहे. तरी सदर राजीनामा मंजूर करणार यावा ही विनंती
advertisement
काँग्रेसने मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही
या घडामोडीनंतर काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण विभागात नेतृत्व रिक्त झाल्याने पुढील संभाव्य नियुक्त्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चोरगे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतही अंदाज वर्तवले जात असून ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसने मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 14, 2025 4:34 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Maharashtra Congress: बिहारच्या निकालानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसला मोठा धक्का, चिंता वाढली


