उन्हाळ्यात का होते गडद पिवळी लघवी?

गर्मीच्या दिवसात अनेकांना गडद पिवळी लघवी होते. ज्यामुळे कधीकधी लघवी करताना किंवा केल्यानंतर लघवीच्या जागी जळजळ जाणवते.

तुम्हाला ही अशी समस्या उद्भवली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे गंभीर आजाराचे संकेत आहे.

वातावरणातल्या उष्णेमुळं शरीरातलं पाणी कमी होणं म्हणजेच डीहायड्रेशनचा त्रास खूप जणांना होत असतो. उन्हामुळं घाम बाहेर पडतो आणि लघवीच्या माध्यमातूनही शरीरातलं पाणी बाहेर पडत असतं.

अशातच जर आपण कमी पाणी प्यायलो तर शरीरातलं पाण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी होतं. त्यामुळं लघवीच्या रंगावर परिणाम होतो.

शरीरातलं पाण्याचं प्रमाण जसजसं कमी होतं, तसतसा हा रंग पिवळा होऊ लागतो. तसंच लघवीला दुर्गंध येऊ लागतो आणि लघवीच्या जागेला जळजळ होण्याचा त्रास काही जणांना होतो.

डॉ. रवी बन्सल सांगतात, की आपल्या शरीरात 60 टक्के प्रमाण पाण्याचं आहे. शरीराचं तापमान संतुलित राखण्यासाठी शरीरात पुरेशा पाण्याची गरज असते.

किडनीसारखे काही अवयव फक्त शरीरातल्या पाण्यावर काम करतात. त्यामध्ये पाणी कमी झालं तर शरीरात विषद्रव्यं पसरू लागतात आणि मग अनेक आजार होऊ शकतात.

लघवीचा रंग पिवळा होण्याचं कारण म्हणजे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं. शरीरात पाणी कमी झालं, की किडनीकडून फक्त पाणी साठवून अन्य नको असलेले घटक शरीराबाहेर फेकले जातात.

शरीरात पाणी कमी झाल्यावर थकवा येणं, त्वचा तसंच ओठ कोरडे होणं आणि तहान लागणं, लघवीचा गडद पिवळा रंग आणि लघवीचं प्रमाण कमी होणं अशी काही लक्षणं दिसू लागतात.