ई-सिगरेट आरोग्यसाठी किती धोकादायक असते? डॉक्टरांनी सांगितले तोटे

अनेक लोक ई-सिगारेट किंवा वेपिंग हे पारंपरिक सिगारेटपेक्षा कमी हानिकारक समजून वापरतात. तरुणांमध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

पण, डॉक्टरांच्या मते, ई-सिगारेट देखील आरोग्यासाठी तेवढीच धोकादायक आहे. यामध्ये जरी तंबाखू नसली तरी, निकोटीन आणि इतर अनेक विषारी रसायने असतात, जी फुफ्फुसे आणि हृदयाला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.

ई-सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या वाफेमध्ये अल्ट्राफाइन पार्टिकल्स आणि विषारी रसायने असतात. हे कण फुफ्फुसांमध्ये जातात आणि तिथे सूज निर्माण करतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात.

ई-सिगारेटमध्येही निकोटीन असते, जे खूप व्यसन लावणारे रसायन आहे. नियमित वापरामुळे याचे व्यसन लागते आणि ते सोडणे खूप कठीण होते. निकोटीनमुळे मेंदूच्या विकासावरही नकारात्मक परिणाम होतो.

निकोटीनमुळे रक्तदाब आणि हृदयाची गती वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि भविष्यात हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

ई-सिगारेटमध्ये डायसिटाइल आणि फॉर्मल्डिहाइड सारखी कर्करोगास कारणीभूत रसायने असू शकतात, जी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करतात. ई-सिगारेटच्या लिक्विडमध्ये प्रोपीलीन ग्लायकोल आणि व्हेजिटेबल ग्लिसरीन सारखी रसायने असतात. गरम झाल्यावर ही रसायने हानिकारक घटक तयार करतात, जे शरीरासाठी विषारी ठरतात.

ई-सिगारेटचे आकर्षक फ्लेवर्स आणि डिझाइनमुळे युवा पिढी याच्याकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे, कमी वयातच त्यांना निकोटीनचे व्यसन लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)