कच्चे चिकन फ्रिजमध्ये किती दिवस ठेवू शकता?

स्वयंपाकघरात कच्चे चिकन स्टोर करून ठेवणे ही एक सामान्य सवय आहे, पण अन्न सुरक्षा नियमांनुसार, कच्चे मांस फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

बॅक्टेरियाच्या वाढीमुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळे, कच्च्या चिकनच्या साठवणुकीचे योग्य नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

आरोग्य तज्ञांच्या मते, कच्चे चिकन फ्रिजमध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस ठेवणे सुरक्षित असते. यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास बॅक्टेरिया झपाट्याने वाढू लागतात.

फ्रिजचे तापमान नेहमी 4 अंश सेल्सिअस (4°C) किंवा त्याहून कमी ठेवावे. या तापमानामुळे बॅक्टेरियाची वाढ मंदावते. यापेक्षा जास्त तापमानात चिकन सुरक्षित राहत नाही.

कच्चे चिकन स्टोर करताना ते नेहमी हवाबंद डब्यात किंवा सीलबंद पिशवीत ठेवा. यामुळे चिकनचा रस इतर खाद्यपदार्थांवर पसरत नाही आणि दूषित होण्याचा धोका टळतो.

कच्चे चिकन नेहमी फ्रिजच्या सर्वात खालच्या रॅकवर ठेवावे. त्यामुळे, त्यातून निघणारे द्रव इतर खाद्यपदार्थांवर टपकणार नाही आणि स्वच्छता राखली जाईल.

जर तुम्हाला चिकन 2 दिवसांपेक्षा जास्त काळ साठवायचे असेल, तर ते त्वरित फ्रीजरमध्ये ठेवावे. फ्रीजरमध्ये ठेवलेले चिकन 9 महिने ते 1 वर्षापर्यंत सुरक्षित राहू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)