2,3,4 की रोज आठवड्यातून कितीवेळा केस धुवायला हवेत?

केसांची काळजी घेताना अनेकदा एक प्रश्न पडतो की, केस आठवड्यातून किती वेळा धुवावेत? काही लोक रोज केस धुतात, तर काही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा.

केस धुण्याची योग्य संख्या प्रत्येक व्यक्तीच्या केसांच्या प्रकारावर आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. यावर तज्ञ काय सांगतात, ते जाणून घेऊया.

केस धुण्याची संख्या तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून असते. तेलकट केस असलेल्या लोकांनी दररोज किंवा एक दिवसाआड केस धुवावेत, जेणेकरून टाळूवरील अतिरिक्त तेल निघून जाईल. कोरड्या केसांसाठी आठवड्यातून 2-3 वेळा केस धुणे पुरेसे आहे.

तुम्ही कुठे राहता आणि तुमची जीवनशैली कशी आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही जास्त प्रदूषित किंवा दमट वातावरणात राहत असाल, तर रोज केस धुणे आवश्यक असू शकते.

तसेच, जे लोक जास्त व्यायाम करतात किंवा ज्यांना खूप घाम येतो, त्यांनी रोज केस धुवावेत. केस रोज धुतल्यास टाळू कोरडी होऊ शकते. यामुळे केस निर्जीव आणि कमकुवत होतात. तसेच, काही शॅम्पूमध्ये असलेल्या रसायनांमुळे केसांचे नैसर्गिक तेल कमी होऊ शकते.

केस जास्त काळ न धुतल्यास टाळूवर तेल, घाण आणि मृत पेशी जमा होतात. यामुळे कोंडा आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते.

जर तुम्हाला केस लवकर धुवायचे नसतील, तर तुम्ही ड्राय शॅम्पूचा वापर करू शकता. यामुळे केसांमधील तेल कमी होते आणि ते ताजे वाटतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)