सकाळी की संध्याकाळी, नेमका कधी प्यावा चहा?

आपल्यापैकी बहुतेकांचा दिवस गरम चहाच्या कपने सुरु होतो आणि अनेकांना संध्याकाळी कामाचा थकवा घालवण्यासाठी चहा लागतोच. पण चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, यावर नेहमीच चर्चा होते. सकाळी की संध्याकाळी? आरोग्य तज्ञांच्या मते, चहा पिण्याची वेळ आणि प्रमाण या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतात.

सकाळी उठल्याबरोबर लगेच चहा पिणे टाळा. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पोटात ॲसिडिटी, गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे चहा पिण्याआधी काहीतरी हलका आहार घ्या, जसे की बिस्किट किंवा टोस्ट.

सकाळचा नाश्ता झाल्यावर, एक तासाने चहा पिणे सर्वात उत्तम मानले जाते. या वेळी चहा प्यायल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते आणि कामासाठी उत्साह येतो.

जेवणानंतर लगेच चहा पिण्याची सवय अनेकांना असते. पण, चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो, जो शरीरातील लोह आणि इतर पोषक तत्वांचे शोषण कमी करतो. त्यामुळे जेवण आणि चहा पिण्यामध्ये किमान एक तासाचे अंतर ठेवा.

संध्याकाळी चहा पिण्याने थकवा दूर होतो, पण सायंकाळी 4 नंतर चहा पिणे टाळावे. चहातील कॅफीनमुळे झोपेचे चक्र बिघडू शकते आणि निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.

तुम्ही दिवसातून किती चहा पिता, हे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून 2 ते 3 कप चहा पिणे पुरेसे आहे. जास्त चहा प्यायल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

ब्लॅक टी किंवा ग्रीन टी मध्ये कॅफीन असल्यामुळे ते सकाळी किंवा दिवसात कधीही घेऊ शकता. पण, हर्बल चहामध्ये कॅफीन नसते, त्यामुळे तो रात्री झोपण्यापूर्वी प्याल्यास आराम मिळतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)