तरुण शेतकरी रेशीम शेतीतून कसा झाला लखपती?

लहरी हवामान, नुकसान भरपाई मिळण्यासाठी लागणारा वेळ यामुळे शेती हा आव्हानात्मक व्यवसाय बनला आहे.

या प्रतिकूल परिस्थितीमध्येही काही शेतकरी नवीन प्रयोग करत आहेत.

जालना जिल्ह्यातल्या एका उच्च शिक्षित दाम्पत्यानंही शेतीमध्ये एक प्रयोग केलाय.

या प्रयोगातून ते वर्षाला सात लाखांची कमाई करत आहेत.

 घनसावंगी तालुक्यात निपाणी पिंपळगावचे रहिवाशी असलेल्या दत्ता माने यांची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.

माने हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी करत होते.

तब्बल चार वेळा त्यांनी मुख्य परीक्षेचा टप्पा देखील गाठला मात्र त्यांना अपयश आलं.

या अपयशानंतर न खचता त्यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये लक्ष घालण्याचं ठरवलं.

कोणत्या पिकांमधून जास्त उत्पन्न घेता येईल याचा त्यांनी विचार सुरू केला.

त्यावेळी रेशीम शेतीमधून चांगलं उत्पादन घेऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आले.

माने यांनी 2021 साली तुती लागवड करुन या व्यवसायाला सुरूवात केली. त्यांची पहिल्याच बॅचमध्ये 60 हजारांची कमाई झाली.

आता दर 21 दिवसांनी त्यांच्या संगोपन गृहात 60 ते 70 हजार रुपये किमतीचा रेशीम कोष तयार होत आहे.

यातून त्यांना महिना 60 ते 70 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.

तर वर्षाला सुमारे सात लाख रुपये उत्पन्न मिळत आहे, असे माने यांनी सांगितलं.