रोहितने एका झटक्यात सर्व दिग्गजांना मागे टाकले, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला विक्रम
टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेटनी पराभव करून तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
भारतीय संघाने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकत मोठा पराक्रम केला आहे आणि यासोबतच कर्णधार रोहित शर्माने ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्मा आता आशियातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याने सलग दोन ICC ट्रॉफी आपल्या देशाला मिळवून दिल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 मध्ये टी20 विश्वचषक आणि आता 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
याआधी हा विक्रम कपिल देव, इमरान खान, अर्जुन रणतुंगा किंवा महेंद्रसिंग धोनी यांसारख्या दिग्गज कर्णधारांनाही करता आला नव्हता. रोहित शर्मा हा जगातील चौथे कर्णधार ठरला आहे, ज्यांने सलग दोन ICC स्पर्धा जिंकल्या आहेत आणि तो आशियाचे एकमेव कर्णधार आहे ज्यांने हा पराक्रम केला आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे विश्वचषक जिंकले होते. तर, रिकी पाँटिंगने 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2007 मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता.
सर्वप्रथम वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांनी 1975 आणि 1979 मध्ये सलग दोन विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला होता.
आयसीसीच्या सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावावर असून त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी चार ICC ट्रॉफी (दोन वनडे विश्वचषक आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकल्या आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीने भारतासाठी 2007 चा टी20 विश्वचषक, 2011 चा वनडे विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
भारताने आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धेचे 7 वेळा विजेतेपद मिळवले आहे. ज्यात 2 वनडे वर्ल्डकप, 3 चॅम्पियम्स ट्रॉफी, 2 टी-20 वर्ल्डकपचा समावेश आहे.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या फायनलमध्ये रोहित शर्माने अर्धशतकी (76) खेळी केली. आयसीसी स्पर्धेच्या फायनल मॅचमध्ये रोहितने केलेली ही सर्वोच्च खेळी आहे. याआधी त्याला कधीच मोठी धावसंख्या करता आली नव्हती. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.