११ बळी, अब्जावदीचं नुकसान… कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस आगीच्या विळख्यात
अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथं जंगलामध्ये लागलेल्या आगीमुळं एक नवं संकट ओढावलं आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस येथे लागलेल्या आगीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीमुळे अमेरिकेचे अंदाजे 200 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
या आगीने सर्वसामान्यांपासून विशेषांपर्यंत सर्वांनाच लक्ष्य केले आहे. अनेक अभिनेते आणि नेत्यांची घरे जळून खाक झाली आहेत.
अतिशय भीषण आणि प्रचंड प्रमाणात लागलेल्या या आगीचं कारण काय? घटनास्थळाची दृश्य पाहून उडेल थरकाप.
जवळपास दोन ते तीन दिवसांपासून अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये धुमसणारा वणवा अद्याप शांत झाला नसून, मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या या आगीच्या झळांनी सर्वकाही बेचिराख केलं आहे.
अमेरिकेतील हा आगडोंब वाढत असतानाच आतापर्यंत प्रशासनानं इथून जवळपास 130000 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं आहे. दरम्यान, ही येथील भागामध्ये लागलेली सर्वात मोठी आग असल्याची माहितीसुद्धा आता समोर येत आहे.
वातावरणातील बाष्पाचा अभाव आणि वाऱ्याचा प्रचंड वेग यामुळं ही आग अद्यापही विझवता आली नसून, यामध्ये अनेकांची घरंदारं जळून खाक झाली आहे.
कॅलिफोर्नियामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी आल्यानं पॅलिसेड्स भागाचं मोठं निकसान झालं असून, त्यामागोमाग ईटन इथंही परिस्थितीनं वाईट रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत या भागामध्ये 2000 इमारती आणि घरं नष्ट झाली असून ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती प्रशासनानं व्यक्त केली आहे.