तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की भारतातील बहुतांश नेते हे पांढरे कपडे घालतात.
पण हे नेते मंडळी पांढरे कपडे का घालतात? या सर्वाची सुरुवात कुठून आणि कधीपासून झाली? कधी विचार केलाय का?
या प्रश्नाचे उत्तर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सापडते. स्वातंत्र्य चळवळीत गांधींनी स्वदेशीचा नारा दिला, तेव्हा लोकांनी विदेशी कपड्यांची होळी केली.
देशासाठी स्वावलंबन आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे हे पहिले पाऊल होते, जेणेकरून भारतीयांना स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गुलाम मानसिकतेतून मुक्तता मिळू शकेल.
त्याच वेळी, खादीपासून बनविलेले कपडे बहुतेक पांढरे रंगाचे होते. अशाप्रकारे त्या काळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारी हे कपडे घालायचे.
तेव्हापासून आजतागायत राजकारणी फक्त पांढऱ्या कपड्यातच दिसतात.
पांढरा रंग हा सत्य आणि अहिंसेचे प्रतीक मानला जातो. तर, कुर्ता, पायजमा, धोती, टोपी, सूट आणि साडी हे भारतीय पारंपरिक पोशाख आहेत. हा रंग अतिशय आकर्षक आहे.
जेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घालता तेव्हा तुमच्यामध्ये साधेपणा दिसून येतो. त्यातून तुम्हाला नेतृत्वाची जाणीव होते.
या सर्व कारणामुळे राजकारणी मंडळी पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात आणि त्यामुळे पांढरा रंग हा राजकारणातील मंडळीची ओळख बनली आहे.