advertisement

....तर शेतकऱ्यांना मिळणार २५ लाख रुपये! संसदेत सादर झालेले विधेयक काय आहे?

Last Updated:

Agriculture News : भाजपचे राज्यसभा खासदार सतनामसिंग संधू यांनी सोमवारी (९ फेब्रुवारी) संसदेत तीन महत्त्वाची खासगी विधेयके मांडून शेतकरी, प्रवासी भारतीय आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधले.

Agriculture News
Agriculture News
नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार सतनामसिंग संधू यांनी सोमवारी (९ फेब्रुवारी) संसदेत तीन महत्त्वाची खासगी विधेयके मांडून शेतकरी, प्रवासी भारतीय आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधले. किसान जीवन सुरक्षा व दुर्घटना भरपाई विधेयक २०२५, प्रवासी भारतीय कौशल्य व प्रतिभा प्रोत्साहन विधेयक २०२५ आणि उच्च शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय मानांकन व मान्यता प्राधिकरण विधेयक अशी या विधेयकांची नावे आहेत. विकसित भारत २०४७ या संकल्पनेला गती देणे हा या विधेयकांचा मुख्य उद्देश असल्याचे संधू यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी सार्वत्रिक अपघात विम्याचा प्रस्ताव
शेतकरी जीवन सुरक्षा व दुर्घटना भरपाई विधेयक २०२५ अंतर्गत सर्व नोंदणीकृत शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अपघाती विमा संरक्षण सक्तीचे करण्याचा प्रस्ताव आहे. शेतीकामादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, तर अंशतः अपंगत्वाच्या प्रकरणात १ लाख रुपयांपासून ठरावीक मर्यादेपर्यंत भरपाई देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. ही रक्कम थेट पीडित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.
advertisement
केंद्र–राज्य सरकारकडून संयुक्त अनुदान
या विमा योजनेचा भार शेतकऱ्यांवर पडू नये यासाठी केंद्र सरकार सुमारे ६० टक्के प्रीमियम, तर उर्वरित हिस्सा राज्य सरकारे अनुदानाच्या स्वरूपात उचलतील, असे संधू यांनी सांगितले. यामुळे गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय कृषी जोखीम विमा प्राधिकरणाची स्थापना
या विधेयकाद्वारे राष्ट्रीय कृषी जोखीम विमा प्राधिकरण (NARIA) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही एक वैधानिक व स्वायत्त संस्था असून, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी परवडणारी, व्यापक आणि सक्तीची अपघात विमा योजना तयार करणे, तिची अंमलबजावणी करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे ही तिची जबाबदारी असेल. सध्या शेती अपघातांसाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा नसल्याने ग्रामीण सामाजिक सुरक्षेत मोठी पोकळी असल्याचे संधू यांनी अधोरेखित केले.
advertisement
शेती हा सर्वांत धोकादायक व्यवसाय
सभागृहात बोलताना संधू यांनी सांगितले की, देशातील सुमारे ४६ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र, शेती हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय असून दरवर्षी १० ते १५ हजार शेतकऱ्यांचा शेतीकामादरम्यान मृत्यू होतो. हाताने पीक कापणी, कीटकनाशकांची फवारणी, अवजड यंत्रसामग्रीचा वापर, तीव्र उष्णता, पूर यांसारख्या अनेक धोक्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
advertisement
ग्रामीण कुटुंबांवर होणारा सामाजिक परिणाम
या अपघातांमुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर अनेक ग्रामीण कुटुंबे दारिद्र्य, कर्जबाजारीपणा आणि सामाजिक असुरक्षिततेच्या चक्रात अडकतात, असेही त्यांनी नमूद केले. सध्याच्या पंतप्रधान पीकविमा योजना किंवा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना या मर्यादित स्वरूपाच्या असल्याने शेतकऱ्यांना सर्वसमावेशक संरक्षण मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवासी भारतीय आणि उच्च शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र प्राधिकरण
याशिवाय, परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या कौशल्याचा देशाच्या विकासासाठी उपयोग करण्यासाठी प्रवासी भारतीय कौशल्य व प्रतिभा प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच, भारतीय उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता जागतिक दर्जाशी सुसंगत करण्यासाठी राष्ट्रीय मानांकन व मान्यता प्राधिकरण (NRAA) स्थापन करण्याची मागणी या विधेयकातून करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
....तर शेतकऱ्यांना मिळणार २५ लाख रुपये! संसदेत सादर झालेले विधेयक काय आहे?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement