अपयशातूनच यशाची वाट सापडली
दिलीप कांबळे यांना २०१५ साली ऑनलाइन माध्यमातून मोती शेतीबाबत माहिती मिळाली. या क्षेत्रात महाराष्ट्रात फारच कमी लोक कार्यरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही संधी ओळखली. २०१६ मध्ये त्यांनी नागपूर येथे प्राथमिक प्रशिक्षण घेतले, मात्र अपूर्ण माहिती आणि अनुभवाअभावी सलग तीन वर्षे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही.
advertisement
ओडिशातील प्रशिक्षणाने बदलले भविष्य
अपयशानंतरही खचून न जाता कांबळे यांनी ओडिशातील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अॅक्वाकल्चर (CIFA) येथे सखोल प्रशिक्षण घेतले. योग्य तांत्रिक ज्ञान मिळाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये नव्या जोमाने पुन्हा सुरुवात केली. सुरुवातीला ५,००० ऑयस्टरपासून शेती सुरू करत त्यांनी पुढे १८,५०० ऑयस्टरपर्यंत प्रकल्प वाढवला आणि यश त्यांच्या पायाशी आले.
निर्यात दर्जाच्या मोत्यांनी दिले आर्थिक बळ
२०२१ हे वर्ष कांबळे यांच्या आयुष्यात निर्णायक ठरले. याच काळात त्यांना पहिला निर्यात दर्जाचा, आकर्षक आकाराचा मोती मिळाला. परदेशी बाजारात या मोत्यांना प्रचंड मागणी असून, एका मोत्यामागे ३०० ते ५०० रुपये दर मिळू लागला, जो देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा जवळपास तिप्पट होता. साधारण १०० रुपयांची गुंतवणूक करून ते थेट ३०० ते २,००० रुपयांपर्यंत कमाई करू लागले.
स्वतःचे तलाव, स्वतःचा व्यवसाय
आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर कांबळे यांनी स्वतःचे तलाव उभारून उत्पादन वाढवले. आज ते विविध आकारांचे आणि उच्च प्रतीचे मोती तयार करतात, ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, निर्यातीसाठी मोती जागतिक दर्जाचे असणे अत्यावश्यक असल्याचे ते आवर्जून सांगतात.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण, देशभरात प्रकल्प
दिलीप कांबळे यांनी केवळ स्वतःपुरते यश मर्यादित न ठेवता इतरांनाही या व्यवसायाकडे वळवले आहे. २०१९ पासून आतापर्यंत त्यांनी सुमारे शेकडो शेतकऱ्यांना मोती शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या देशभरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मोती शेती प्रकल्प कार्यरत आहेत. निर्यातीमधून मिळणाऱ्या भरघोस नफ्यामुळे त्यांनी पूर्णपणे या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला काय?
मोती शेती सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी कांबळे यांचा सल्ला स्पष्ट आहे. सुरुवातीचा खर्च फार मोठा नसतो, कमी भांडवलातही चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र, कोणताही प्रकल्प फसणार नाही यासाठी योग्य आणि अधिकृत प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.
