१) शेणापासून बनवलेली कुंड्या
आजपर्यंत बागकामासाठी सिमेंट किंवा मातीच्या कुंड्यांचा वापर केला जात होता. मात्र या कुंड्या फुटल्यानंतर त्या कचऱ्यात जातात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात. याच्या तुलनेत शेणापासून बनवलेल्या कुंड्या पूर्णपणे जैवविघटनशील असतात. या कुंड्यांमध्ये लावलेली रोपे अधिक चांगली वाढतात. कुंडी खराब झाल्यावर ती थेट कंपोस्टमध्ये वापरता येते, त्यामुळे कचरा कमी होतो आणि खतही तयार होते.
advertisement
२) शेणाच्या गोळ्या
धार्मिक विधी, हवन-पूजा आणि पारंपरिक समारंभांमध्ये शेणाच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या गोळ्या जळताना ३ ते ४ तास टिकतात आणि वातावरण शुद्ध करण्यास मदत करतात. जळाल्यानंतर उरलेली राख झाडांसाठी उत्तम पोषणद्रव्य ठरते. दसरा, दिवाळी आणि इतर धार्मिक सणांच्या काळात या गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा हंगामी पण फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.
३) सेंद्रिय अगरबत्ती
पावसाळ्यात डासांचा त्रास वाढतो आणि बाजारातील रासायनिक अगरबत्ती आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. यावर पर्याय म्हणून गायीच्या शेणापासून बनवलेल्या सेंद्रिय डास प्रतिबंधक अगरबत्त्या बाजारात लोकप्रिय होत आहेत. या अगरबत्त्यांमध्ये नैसर्गिक सुगंधी द्रव्यांचा वापर केला जातो. सेंद्रिय उत्पादनांकडे ग्राहकांचा वाढता कल पाहता, हा उद्योग शेतकऱ्यांना चांगला नफा देणारा ठरत आहे.
४) पर्यावरणपूरक राख्या
स्वदेशी उत्पादनांना वाढती मागणी आणि चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे, गायीच्या शेणापासून बनवलेल्या राख्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या राख्या सुगंधी, आकर्षक आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक असतात. रक्षाबंधनाच्या सणापूर्वी या राख्यांची विक्री केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
५) शेणाचे लाकूड
वनतोड वाढत असल्याने पर्यावरणावर मोठा ताण येत आहे. अशा वेळी शेणापासून तयार केलेले कृत्रिम लाकूड हा उत्तम पर्याय ठरत आहे. याचा वापर हवन, अंत्यसंस्कार तसेच काही फर्निचर निर्मितीसाठीही केला जातो. यंत्राच्या साहाय्याने तयार केलेले हे लाकूड वाळवून, रंगवून बाजारात विकले जाते आणि यामधून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवता येतो.
६) मूर्ती आणि सेंद्रिय खत
सिमेंट किंवा रासायनिक मातीपासून बनवलेल्या मूर्तींमुळे जलप्रदूषण वाढते. त्याऐवजी शेणापासून बनवलेल्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत. याशिवाय, शेण आणि गोमूत्रापासून सेंद्रिय खत, जैवखत आणि जीवामृत तयार करून नैसर्गिक शेतीला चालना देता येते.
