मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ओयो हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने संबंधित ओयो हॉटेलवर छापेमारी केली. यावेळी येथील रुममध्ये चार तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचं समोर आलं.
ही छापेमारी केल्यानंतर वेश्याव्यवसायात गुंतलेले चार आरोपी हॉटेलमधून पळून जात होते. यातील दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. दोघांच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत. चेतन चकोले आणि युगांत दुर्गे अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहे. आणखी दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
advertisement
पोलिसांनी ओयो हॉटेलमध्ये धाड टाकून ही संपूर्ण कारवाई केली. यात चार पीडित तरुणींकडून काहीजण वेश्याव्यवसाय करवून घेताना आढळले. आरोपींच्या ताब्यातून चार पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तसेच हॉटेलमध्ये ग्राहकांना पिण्यासाठी हुक्का पुरविण्यात येत असल्याचं देखील समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाइल, हुक्का पॉट आणि इतर साहित्य असा एकूण 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.