'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी स्वतःसोबत प्रामाणिक राहून अभिनयाबद्दलचा निर्णय घेतला आहे. चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये सातत्याने काम केल्यानंतर मला जाणवले की सतत काम करून मी स्वतःला प्रेरित करत नाहीये. कामाप्रती माझा उत्साह दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. अभिनेत्याने पुढे सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
पंकज त्रिपाठीने अभिनयातून ब्रेक घेण्याबद्दल सांगितले की, "मी सतत कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. त्यामुळे मला कंटाळा आला होता आणि माझे शरीर थकले होते.. मला माझ्या दररोजच्या कामामध्ये आनंद मिळत नव्हता. ब्रेकची खूप गरज भासत होती. आता मी माझ्या कामांची निवड खूप सिलेक्टिव्ह पद्धतीने करतोय. मी फक्त अशा कामासाठी घराबाहेर पडतो जे मला उत्तेजित करते. मला माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक चित्रपटात किंवा वेबसीरिजमध्ये काम करायचे नाही. मी सध्या माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे मी फक्त माझ्या एनर्जीसाठी आणि आर्टिफिस्टिक सॅटीसफॅक्शनसाठी अभिनय करतो. मी ते ईएमआयसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काम करू शकत नाही. मला आयुष्यभर काम करत राहायचे आहे आणि ते दीर्घकाळात माझ्यासाठी काम करते का ते पहायचे आहे."
2025 या वर्षात पंकज त्रिपाठी यांनी चित्रपट 'मेट्रो इन दिनों' आणि वेबसिरिज 'क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर' अशा दोन प्रॉजेक्टमध्ये काम केले आहे. एका मुलाखतीत बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले होते, "मी पूर्वी संथ आयुष्याचा प्रचार करायचो आणि स्वतः वेगवान आयुष्यात अडकलो, विशेषतः कोविडच्या आधी आणि नंतर. मला जाणवले की एका अभिनेत्याने त्याचे शस्त्र खूप काळजीपूर्वक वापरले पाहिजे. आता माझ्यावर जास्त जबाबदाऱ्या नाहीत. मला वाटले की मी फक्त अशा कथांशी जोडले जावे ज्या मला उत्तेजित करतात. ३० दिवस सतत काम केल्याने तुम्हाला थकवा येतो आणि मीही थकलो होतो."
अभिनेता म्हणाला की, "मला वाटतं की मी खूप जास्त काम करतो आणि मला तसं काम करण्याची काही गरज वाटत नव्हती. प्रेक्षकांनीही माझ्या प्रोजेक्टसाठी थांबायला हवं, त्यांना सुद्धा कुतूहल वाटायला हवं माझा पुढचा चित्रपट किंवा वेबसीरीज कशी असेल, याबद्दल. त्यामुळे मी माझ्या कामाचा वेग कमी केलाय. मी जगण्यासाठी अभिनय करतो, अभिनयासाठी जगत नाही. मी खूपच फास्ट लाईफ जगलो आहे, आता मला हळू हळू माझं लाईफ जगायचं आहे. काही काळानंतर, मी कोणता दृष्टिकोन चांगला आहे याचे पुन्हा विश्लेषण करेन." पंकज त्रिपाठी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने 'परफेक्ट फॅमिली' या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रॉडक्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ओटीटीवर फेमस झालेल्या 'मिर्झापूर' वेबसीरीजच्या अभूतपूर्व यशानंतर 'मिर्झापूर: द मुव्ही'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, जो चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे.
