नवी दिल्ली : अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात नसून घात आहे, असा आरोप अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनी केला आहे. शेवटच्या क्षणी अजित पवारांचे पायलट बदलले गेले का? आधी ठरले होते ते पायलट ट्रॅफिकमध्ये अडकले, पण मुंबईमध्ये एवढ्या सकाळी कोणता ट्रॅफिक होता? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन विचारले.
advertisement
अजित पवारांचं विमान चालवणारे पायलट सुमित कपूर हे हाँगकाँगवरून आले होते का? ते दारू पिऊन होते का? हा कपूर खूप दारू प्यायला होता, म्हणून त्याला ट्रेनिंगला नेलं नाही, असंही रोहित पवार त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.
अजित पवारांचं विमान चालवणारे पायलट सुमित कपूर यांनी ड्युटीवर असताना मद्यसेवन केल्यामुळे त्यांना दोनदा बडतर्फ करण्यात आलं होतं, अशी माहिती अजित पवारांचं विमान कोसळल्यानंतर समोर आली होती. याचाच संदर्भ घेऊन रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये कॅप्टन सुमित कपूर यांनी त्यादिवशीही मद्यसेवन केलं होतं का? असा प्रश्न विचारला.
2010 साली कॅप्टन सुमित कपूर हे ड्युटीवर असताना मद्यसेवन केलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले होते. या घटनेनंतर संबंधित विमान कंपनीने त्यांना कामावरून काढलं होतं. यानंतर 2017 साली पुन्हा एकदा सुमित कपूर ड्युटीवर असताना अल्कोहोल पॉझिटिव्ह आढळले. ऑन ड्युटी दारू प्यायलाचं दुसऱ्यांदा निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर प्राधिकरणाने 3 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली होती. यानंतर सुमित कपूर हे व्हीएसआर व्हेन्चर्स या कंपनीमध्ये 5 वर्षांपासून काम करत होते.
