चंद्रपूर महानगरपालिका महापौर निवडणुकीत आज भाजपच्या झालेल्या अनपेक्षित विजयानंतर कारवाईला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची हकालपट्टी करण्यात आली तसेच त्यांनी केलेल्या सर्व नियुक्तींना देखील स्थगिती देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहण्याची भूमिका घेतली. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नगरसेवकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
advertisement
नेमकं काय घडलं?
चंद्रपूर महापालिकेत दुसऱ्या स्थानी असतानाही भाजपनं चंद्रपूर महापालिकेचा सत्ता स्थापनेची मॅजित फिगर गाठली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळं भाजपनं चंद्रपूरचा गड सर केला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने महापौरपदाची निवडणूक जिंकली. चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 नगरसेवक असून बहुमताचा आकडा 34 होता. अशातच महापौरपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहीले तर एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिला.
यामुळं सभागृहातील बहुमताचा आकडा 33 आला. भाजपचे 23, शिवसेनेचा एक, शिवसेना उबाठाचे सहा आणि दोन अपक्ष असं 32चं संख्याबळ भाजपकडे आलं.
भाजपच्या खेळीमुळं चंद्रपुरात काँग्रेसचं गणित मात्र बिघडलं आणि महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. काँग्रेस 27, जनविकास सेना 3, बसपाचा एक असं 31 संख्याबळ झालं. अवघ्या एका मतानं भाजपचा विजय झाला आहे. ठाकरेंच्या पक्षानं भाजपला साथ दिल्यानं काँग्रेसच्या हातातोडांशी आलेली सत्ता हिरावले गेली.
चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत होती. महापौरपद मिळावं या ठाकरेंच्य पक्षाची मागणी होती. अशातच संजय राऊतांनी चंद्रपुरात भाजपासोबत जाणार नाही अशी भूमिका संजय राऊतांनी घेतली होती .मात्र राऊतांच्या या भूमिकेच्या उलट भूमिका चंद्रपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेनं घेत थेट भाजपला पाठिंबा दिला आहे. चंद्रपुरात भाजपनं शिवसेना उबाठाला सव्वा वर्षानंतर महापौरपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचसोबत पहिल्या आणि चौथ्या वर्षी स्थायी समितीचं अध्यक्षपद ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं जाणार आहे....
राजकीय खेळी करत काँग्रेसला सत्तेबाहेर
चंद्रपुरात 27 जागा मिळवून सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. पण त्याला आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकरांमधील गटबाजी कारणीभूत ठरलीय. निवडणुक निकालानंतर काँग्रेसचे नगरसेवक दोन गटात विभागले गेले होते. गटनोंदणी दरम्यान ती गटबाजी चव्हाट्यावर आली होती.पण पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र आले होते. पण दरम्यान भाजपनं राजकीय खेळी करत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळवलं.
ईश्वर चिठ्ठीने उपमहापौर पदाचा फैसला
चंद्रपुरात उपमहापौरपदाची निवडणूकही अत्यंत चुरशीची झाली. उपमहापौर पदासाठी झालेल्या मतदानात काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांना समसमान 32-32 मते मिळाली. अखेर ईश्वर चिठ्ठीने उपमहापौर पदाचा फैसला करण्यात आला.. ईश्वरचिठ्ठीत प्रशांत दानव यांचं नाव आल्यानं त्यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडली.
भाजप-शिवसेना उबाठाचे गळ्यात गळे
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेना नगरसेवकांनी भाजपला साथ देत पक्षाच्या ध्येय धोरणाच मुठमाती दिलीय. भाजप आणि उद्धव ठाकरेंमधला राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उठता बसला भाजपवर टीका करीत असतात. संजय राऊत त्यात आघाडीवर आहेत. भाजप नेतेही ठाकरेंच्या सेनेवर अशाच प्रकारे कडवट टीका करताना दिसतात. पण आता सत्तेसाठी हा सगळा विरोध विसरून भाजप-शिवसेना उबाठाने गळ्यात गळे घातले आहेत. आता चंद्रपुरातील या नव्या युतीवर हे दोन्ही पक्षातील मोठे नेते कोणती भूमिका घेतात हे पाहाणं महत्वाचं आहे.
