धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात मंदिर संस्थानच्या स्वनिधीतून सुमारे 56 कोटी रुपयांची कामे हाती घेतली जात आहेत. पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन संवर्धन तसेच भाविकांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने ही कामे होणार आहेत. कामे सुरू असताना भाविकांची काही काळ गैरसोय होणार असली तरी दीर्घकालीन सुविधांचा विचार करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
advertisement
मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता हाती घेतलेली कामे ही पूर्णतः पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसारच करण्यात येणार आहेत. तसेच याबाबतची निविदा पुरातत्व विभागानेच काढली आहेत. लवकरच या निविदा उघडण्यात येणार आहेत आणि यानंतर महिनाभरात कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
ना तेल ना मसाला, चवीसह आरोग्यसाठीही फायदेशीर, अगदी पटकन तयार होतं हे लोणचं कोणतं?
या कामांचे 6 टप्पे करण्यात आलेले आहेत. त्यात मंदिरातील परिसरातील ऐतिहासिक महात्म्य असलेल्या व जीर्ण होत असलेल्या वास्तूंचे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामांसाठी सुमारे 3 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. या काळात अत्यल्प वेळासाठी दर्शन बंद ठेवण्याची शक्यता आहे. तसेच भाविक आणि पुजारी बांधवांची गैरसोय होऊ शकते तेव्हा सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री तसेच विविध मंत्री, लोकप्रतिनिधी हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यास या कार्यक्रमात बदल होऊ शकतो, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.