जालना - संपूर्ण देशभरात विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्राचे 9 दिवस राज्यभरातील देवीची मंदिरे गर्दीने गजबजली होती. अनेक ठिकाणच्या प्रथा परंपरा लक्षवेधी ठरल्या. यामध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या प्रथा परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने पाळल्या जातात. जालना जिल्ह्यातील मत्स्योदरी देवी संस्थान हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणची नवसाच्या बाळांना झोळीत झेलण्याचा परंपरा देखील अशीच आगळीवेगळी आणि लक्षवेधी परंपरा आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
मच्छोदरी देवी संस्थान ही जालना जिल्ह्यातील अंबड शहरांमध्ये स्थित आहे. नवरात्र उत्सवाचे 9 दिवस इथे मोठा उत्सव असतो. दरवर्षी नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते. मत्स्योदरी देवी संस्थानाचे अध्यक्ष हे परंपरेने तहसीलदार पदावरील व्यक्ती असते. त्यांच्या हस्ते संपत्ती घटस्थापनेचा कार्यक्रम पहिल्या दिवशी होतो. यानंतर सातव्या माळेचा मान हा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतो. यावर्षी देखील जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या ठिकाणी पूजा केली. सातव्या माळेला जिल्हाभरामध्ये प्रशासकीय सुट्टी देखील असते. 9 दिवस मोठी यात्रा या ठिकाणी भरते. संपूर्ण नवरात्र उत्सव भाविक भक्तांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते.
नवसाच्या बाळांना झोळीत झेलण्याची परंपरा या ठिकाणची सगळ्यात आगळीवेगळी परंपरा म्हणजे मानली जाते. यामध्ये देवीला नवस केल्यानंतर झालेल्या बाळाला झोळीत झेलण्याची परंपरेत दरवर्षी 5000 बाळांना या ठिकाणी झोळीत झेलले जाते. त्याचबरोबर देवीच्या मंदिराला असलेल्या 65 पायऱ्यांवर नारळ फोडण्याची व प्रत्येक पायरीवर दिवा लावण्याची परंपरा देखील आहे. प्रत्येक पायरीवर 65 आणि देवीला 3 अशी एकूण 68 नारळ या ठिकाणी नवस पूर्ण झालेले भाविक पुरत असतात. नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणचा उत्सव पाहण्यासाठी दूर दूरवरून भाविक येतात.
108 कुमारिकांचं एकत्र पूजन, प्रत्येकाला 50 पेक्षा जास्त भेटवस्तू, मुंबईतील ही परंपरा नेमकी काय?
चौथ्या माळेपासून मुले झोळीत टाकण्याची प्रथा आहे. यामध्ये दरवर्षी साडेचार ते पाच हजार मुले-मुली झोळीत टाकली जातात. नवस फेडण्याची ही पद्धत पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आधी 25 फुटांवरून मुले झोळीत केलेली जायची. मात्र, कायद्याच्या कचाट्यात ही परंपरा आल्याने आता केवळ 2 ते 3 फुटांवरून मुलांना झोळीत टाकले जाते. या परंपरेचा योग्य पद्धतीने संचलन व्हावे म्हणून 12 योग्य व्यक्तींची निवड संस्थानाकडून करण्यात आली आहे. आत्तापर्यंत हा नवस पूर्ण करताना कोणतीही दुर्घटना झालेली नाही. यावर्षी आतापर्यंत 3000 बालकांना झोळीत टाकल्याची माहिती संस्थानाचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी दिली.