नानासाहेब कडुबा मोरे असं अटक केलेल्या २७ वर्षीय आरोपीचं नाव आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी त्याला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास मुलगी कॉलेजमधून घरी आली होती. घरात कुणीही नसल्याची संधी साधून आरोपीने तिची हत्या केली आणि पसार झाला. सुरुवातीला पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण करून शनिवारी पहाटे ३:३५ वाजता भोलेगाव येथून आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
आरोपीला सासुरवाडीतून अटक
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोरे आणि मृत मुलगी वैष्णवी हे एकाच गावचे रहिवासी असून दोघांची घरं एकमेकांशेजारी आहेत. आरोपी नानासाहेब हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. त्याचे आई-वडील अपंग आहेत. तो कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. गुन्हा केल्यानंतर तो भोलेगाव येथे आपल्या सासुरवाडीला पळून गेला होता. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने एकतर्फी प्रेम प्रकरणातून गुन्हा केला? की याला आणखी काही कारण आहे? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
