प्रोपोलिन वायू गळतीमुळे महामार्ग ठप्प
मुंबई-पुणे महामार्गावर प्रोपोलिन वायू घेवून जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला. या अपघातानंतर टँकरमधून वायूची गळती सुरू झाली. हा वायू अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक असल्याने मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली होती.सुरक्षिततेच्या कारणास्तव अपघातस्थळापासून दोन्ही बाजूंनी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहने रोखण्यात आली.
दोन्ही हात भाजले पण अनर्थ टळला
advertisement
प्रोपोलिन हा वायू उच्च दाबाखाली द्रवरूपात साठवला जातो. दाब कमी होताच तो वेगाने बाहेर पडतो आणि त्यावेळी तापमान –२० ते –२३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. त्यामुळे गळतीच्या ठिकाणी बर्फ साचतो. हा बर्फ त्वचेच्या संपर्कात आला तर गंभीर जखमा होतात. अपघातानंतर टँकर चालकाने हाताने वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही हात भाजले. मदतकार्यादरम्यान घेतलेला एखादा चुकीचा निर्णय अनेकांच्या जीवावर बेतू शकला असता.
पेरूच्या झाडाच्या खुट्टीने वाचले हजारोंचे प्राण
गळती रोखण्यासाठी तज्ज्ञांनी पेरूच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेली खुट्टी वापरण्याचा निर्णय घेतला. मेन व्हॉल्व तुटल्यामुळे गळती वेगाने सुरू होती. पेरूचे लाकूड मऊ आणि लवचिक असल्याने अत्यंत थंड तापमानात ते फुगते आणि घट्ट बसते. जसे वाईनच्या बाटलीला लाकडी सील लावले जाते, त्या आधारावर ही खुट्टी वापरण्यात आली. तब्बल ३६ तास चाललेल्या ऑपरेशननंतर गळती नियंत्रणात आली.
१० किलोमीटर पर्यंतचा परिसर उद्ध्वस्त झाला असता
या टँकरमध्ये तब्बल २२ टन प्रोपोलिन वायू वाहून नेला जात होता. हा वायू वासरहित असल्याने धोका ओळखणे कठीण असते. शरीरात गेल्यानंतर तो श्वास रोखू शकतो आणि ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात आल्यास मोठा स्फोट होऊ शकतो. जर स्फोट झाला असता तर १० किलोमीटरपर्यंतचा परिसर उद्ध्वस्त झाला असता आणि संपूर्ण घाट भाग धोक्यात आला असता.
गॅस ट्रान्सफर आणि पेट्रोल लाईनचा धोका
अपघातस्थळाजवळूनच पेट्रोल कंपन्यांच्या पाइपलाईन्स जात असल्याने धोका अधिक वाढला होता. टँकर हलवण्यासाठी त्यातील वायूचे वजन कमी करणे आवश्यक होते. त्यामुळे तीन टप्प्यांत गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. या काळात प्रत्येक कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होता.
“३२ तासांची वाहतूक कोंडी” ही बाब चर्चेत राहिली खरी, पण या ३२ तासांत टळलेली भीषण दुर्घटना फारच थोड्या लोकांना माहीत होती.पण एका साध्या दिसणाऱ्या पेरूच्या झाडाच्या खुट्टीमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.
