मुंबई : घर खरेदी ही सर्वसामान्य माणसासाठी आयुष्यातील सर्वात मोठ्या आर्थिक निर्णयांपैकी एक मानली जाते. तयार फ्लॅट घेण्याचा विचार करताच सर्वात आधी ग्राहकाच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आपण ज्या किमतीत फ्लॅट घेतोय, तो प्रत्यक्षात किती चौरस फूट आहे? बहुतेक वेळा बिल्डर जे क्षेत्रफळ सांगतो, त्यावरच ग्राहक विश्वास ठेवतो आणि त्यानुसार फ्लॅटची किंमत निश्चित केली जाते. मात्र याच ठिकाणी अनेकदा गैरसमज आणि फसवणुकीची शक्यता निर्माण होते.
advertisement
फ्लॅटच्या जाहिरातीत किंवा करारनाम्यात ‘बिल्टअप एरिया’ हा शब्द हमखास वापरला जातो. सर्वसाधारणपणे इमारतीच्या बाह्य भिंती धरून जे एकूण बांधकाम क्षेत्रफळ मोजले जाते, त्याला बिल्टअप एरिया असे म्हटले जाते. यात घराच्या भिंती, बाल्कनी, कधी कधी पॅसेजचा काही भागही धरला जातो. याउलट ‘कारपेट एरिया’ म्हणजे फ्लॅटच्या आत प्रत्यक्ष वापरात येणारे क्षेत्रफळ. जिथे चटई अंथरता येईल, फर्निचर ठेवता येईल, फिरता येईल, ते संपूर्ण क्षेत्र म्हणजे कारपेट एरिया.
कारपेट एरिया म्हणजे काय?
कारपेट एरियामध्ये प्रत्येक खोलीच्या चार भिंतींच्या आतील मोजमापाचा समावेश होतो. यामध्ये बेडरूम, हॉल, किचन, टॉयलेट तसेच फ्लॅटमधील आतील पॅसेजेसचे क्षेत्र धरले जाते. मात्र बाहेरील जिने, सामायिक पॅसेज, लिफ्ट एरिया यांचा कारपेट एरियात समावेश होत नाही. तरीही अनेक बिल्डर कारपेट एरियावर ठराविक टक्केवारी वाढवून बिल्टअप एरिया दाखवतात.
याच ठिकाणी ग्राहकांची गल्लत होते. काही बिल्डर कारपेट एरियावर २० टक्के अधिक धरून बिल्टअप एरिया सांगतात, तर काही २५ टक्के किंवा त्याहूनही जास्त वाढ लावतात. उदाहरणार्थ, एखाद्या फ्लॅटचे कारपेट एरिया ५०० चौरस फूट असेल, तर काही ठिकाणी त्याचा बिल्टअप ६०० चौरस फूट सांगितला जातो, तर काही ठिकाणी तोच फ्लॅट ६२५ चौरस फूट असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे चौरस फुटाचा दर कमी वाटत असला, तरी प्रत्यक्षात ग्राहकाच्या हाती येणारे क्षेत्रफळ अपेक्षेपेक्षा कमीच असते.
खरे तर फ्लॅटचा अचूक उपयोगी क्षेत्रफळ ग्राहक स्वतःही तपासू शकतो किंवा तज्ज्ञांकडून तपासून घेऊ शकतो. जिना, लिफ्ट आणि सामायिक पॅसेज वगळून फ्लॅटचे प्रत्यक्ष बिल्टअप आणि कारपेट एरिया मोजता येतो. मात्र बहुतेक ग्राहक फ्लॅट खरेदीपूर्वी आर्किटेक्ट किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घेत नाहीत. कागदोपत्री दाखवलेले आकडे पाहूनच करारनाम्यावर सही केली जाते.
नंतर फ्लॅट ताब्यात घेतल्यानंतर घर लहान वाटू लागते, खोलीत अपेक्षित मांडणी होत नाही, तेव्हा ग्राहकांना क्षेत्रफळाबाबत शंका येते. त्या टप्प्यावर चौकशी सुरू होते, पण तोपर्यंत करारनाम्यावर स्वाक्षरी झालेली असते. त्यानंतर बिल्डरने फसवणूक केली, अशी भावना निर्माण होते. प्रत्यक्षात मात्र या स्थितीसाठी ग्राहकही काही अंशी जबाबदार असतो.
काय काळजी घ्यावी?
फ्लॅट खरेदी करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारे क्षेत्रफळ किती आहे, हे स्पष्टपणे समजून घेणे. करारनाम्यात नमूद केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष मोजमाप यांचा ताळमेळ बसवणे अत्यावश्यक आहे. गरज असल्यास दर पुन्हा ठरवावा किंवा क्षेत्रफळाच्या प्रमाणात किंमत कमी करण्याबाबत ठाम भूमिका घ्यावी. फ्लॅटचा अचूक कारपेट एरिया समजून घेऊनच त्या क्षेत्रफळावर आधारित किंमत निश्चित केली, तर भविष्यातील अनेक वाद आणि पश्चात्ताप टाळता येऊ शकतो.
