या काळात त्यांनी स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी हस्तनिर्मित सजावटीच्या वस्तू आणि दागिन्यांच्या निर्मितीचा छंद जोपासला. मात्र साडीबद्दलचं प्रेम त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात सतत जागं होतं. त्यांच्या मते साडी ही फक्त एक वस्त्र नाही, ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि स्त्रीच्या सौंदर्याची ओळख आहे.
हेच प्रेम व्यवसायात रूपांतरित करण्याचा निर्णय त्यांनी 2019 साली घेतला आणि त्यातून जन्म झाला ‘टियारा फॅशन्स’ या ब्रँडचा जिथे प्रत्येक साडी ही एक कथा सांगते. मग ती पारंपरिक हातमागावरील विणीची असो किंवा खास ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेली कस्टम साडी असो.
advertisement
Success Story: एका एकरात केली 340 झाडांची लागवड, शेतकऱ्याला 6 लाख उत्पन्न, असं काय केलं?
साक्षी यांना व्यवसायाचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. ग्राहकांशी संवाद साधणं, बाजारपेठेचा अभ्यास, योग्य डिझाइन्सची निवड, विक्री आणि डिजिटल मार्केटिंग या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून शिकल्या. जिद्द आणि सतत शिकण्याची तयारी यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवत गेला, असं त्या सांगतात.
या प्रवासात त्यांना कुटुंबाचा मजबूत आधार लाभला. त्यांच्या पतीचं आणि घरच्यांचं सततचं पाठबळ हेच त्यांच्या यशामागचं मोठं कारण ठरलं. साक्षी म्हणतात, आज ‘टियारा फॅशन्स’ माझ्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही, तर ते माझं स्वप्न, माझ्या मेहनतीचं प्रतीक आणि माझा आत्मविश्वास आहे.
घरातून सुरू झालेल्या या ब्रँडची लोकप्रियता आज सोशल मीडियावरही झपाट्याने वाढते आहे. त्यांच्या साड्यांमधून पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेची झलकही दिसून येते. आज त्या ह्या व्यवसायातून महिन्याला 60 ते 70 हजार रुपये कमवत आहेत. नक्कीच साक्षी शिर्केंची प्रेरणादायी कहाणी नवउद्योजिकांसाठी एक आदर्श ठरेल.