गोवंडी: जगभरात एकीकडे प्रेमाचा दिवस म्हणून व्हेलेंटाईन विकला सुरुवात झाली आहे. अशातच मुंबईतील गोवंडी भागात प्रेमाच्या त्रिकोणातून एका १९ वर्षीय तरुणीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी २ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी परिसरात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या भागात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीवर याच भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिला आणि २३ वर्षीय तरुणाने गोळीबार केला होता. या १९ वर्षीय तरुणीवर २ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला.
advertisement
गोळीबाराची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी याच भागात राहणाऱ्या एक २५ वर्षीय महिला आणि २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. प्रेम संबंधातून ही हत्या घडली आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास केला जात आहे. या आरोपी महिलेकडे पिस्तुल कुठून आली, कुणी दिली? गोळीबारामागे आणखी कोणता हेतू होता का? याचा अतिरिक्त तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.
