ज्वेलर्सवर ठेवलेला विश्वास नडला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाशी संबंधित असून रुपेश गुर्जर असे आरोपीचे नाव आहे असे समोर आले आहे. त्याच्यासोबत काम करणारा सुरेश हाही बेपत्ता असल्याची माहिती तक्रारदारांनी पोलिसांना दिली आहे.
गुर्जर ग्राहकांकडून सोनं गहाण ठेवून त्यावर व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होता. परिसरातील अनेक कुटुंबांनी वर्षानुवर्षे विश्वासाने दागिने त्याच्याकडे ठेवले होते. मात्र काही दिवसांपासून फोन लागत नसल्याने संशय बळावला. ग्राहक दुकानात पोहोचले असता 22 जानेवारीपासून दुकान बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर या संपूर्ण प्रकरणात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
advertisement
या प्रकरणातील तक्रारदार अमित फुलचंद चौहान (वय 36) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. चौहान हे कोपरखैरणे सेक्टर 19A येथे कुटुंबासह राहतात आणि पाण्याची टपरी चालवतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांपासून महालक्ष्मी ज्वेलर्स कोपरखैरणे भागात आहे.
07 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने दागिने गहाण ठेवून ८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यानंतर त्यांनी दोन टप्प्यांत संपूर्ण रक्कम परत केली. 30 ऑक्टोबर 2025 रोजी 4 लाख रुपये आणि 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा 4 लाख रुपये देण्यात आले. या व्यवहाराबाबत व्हॉट्सअॅपवर संभाषण देखील झाले असून आरोपीने पैसे मिळाल्याचे मान्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तरीही वारंवार मागणी करूनही दागिने परत देण्यात आले नाहीत. 27 जानेवारी 2026 रोजी रुपेश गुर्जरने 2 ते 3 दिवसांत दागिने देतो असे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर त्याचा आणि त्याचा साथीदार सुरेशचा फोन बंद लागला. 03 फेब्रुवारी रोजी चौहान दुकानात गेले असता 22 जानेवारीपासून दुकान बंद असल्याचे समोर आले. परिसरात चौकशी केली असता दोघेही अचानक गायब झाल्याचे समजले.
एकामागून एक तक्रारी; आतापर्यंत 28 जणांचा सहभाग
या प्रकरणात आतापर्यंत 28 तक्रारदार पुढे आले असून त्यांनी 18 ते 24 कॅरेट दरम्यानचे दागिने गहाण ठेवले होते. प्रत्येकाचा कालावधी आणि किंमत वेगवेगळी असली तरी सध्याच्या सोन्याच्या दरानुसार एकूण किंमत दीड कोटी रुपयांच्या घरात जाते. पोलिसांच्या मते, तक्रारदारांची संख्या आणि एकूण रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विश्वासाने ठेवलेलं सोनं बुडाल्याने कुटुंबे अडचणीत
फसवणूक उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. काहींनी लग्नासाठी ठेवलेले दागिने तर काहींनी आपत्कालीन गरजेसाठी ठेवलेले सोनं गमावल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. CCTV,आर्थिक व्यवहार आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
