सोहम कटरे हा डोंबिवली पूर्व येथील रहिवासी असून तो बारावीच्या परीक्षेला बसला होता. मंगळवारी त्याचा पहिलाच पेपर असल्याने तो सकाळी लवकर घरातून निघाला होता. त्याचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालयात होते. नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करत असताना कळवा–मुंब्रा स्थानकांदरम्यान लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या गर्दीत दरवाजाजवळ उभा असलेला सोहम अचानक तोल जाऊन खाली पडला.
advertisement
पहिल्याच पेपरच्या दिवशी काळाचा घाला
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तातडीने रुग्णालयात हलवण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. सोहमच्या अकाली निधनामुळे डोंबिवलीसह कळवा परिसरात शोककळा पसरली आहे. अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि सर्वांचा लाडका विद्यार्थी म्हणून सोहमची ओळख होती. पहिल्याच पेपरच्या दिवशी त्याच्यावर काळाचा असा घाला पडावा, यामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार शोकसागरात बुडाला आहे.
लोकल ट्रेनचा प्रवास आता जीवघेणा
या दुर्दैवी घटनेमुळे मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि प्रचंड गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दररोज लाखो प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याची कटू वास्तविकता या घटनेने अधोरेखित झाली आहे. लोकल ट्रेनचा प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे. प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लोकलमध्ये दोन्ही पाय व्यवस्थित ठेवण्यासाठी जागा नसते. याच गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून प्रवाशांच्या मृत्यूच्या घटना वाढू लागल्या आहेत.
