नाशिक: महाराष्ट्राच्या गावागावात अनेक मंदिरे असून प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. तसेच या मंदिरांशी एखादी आख्यायिका देखील जोडली गेलेली असते. नाशिकच्या टाकळी येथे असेच एक ऐतिहासिक मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वत: गोमातेच्या गोमयापासून मूर्ती बनवली आणि या हनुमान मंदिराची उभारणी केल्याचं सांगितलं जातं. याबाबतच लोकल18 सोबत बोलताना मंदिरातील पुजारी रमेश कुलकर्णी यांनी माहिती दिलीये.
advertisement
समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील जांब गावातून लग्नाच्या मंडपातून निघून गेले. वयाच्या 12 व्या वर्षी गोदावरी नदीच्या काठाने ते थेट नाशिकजवळ टाकळी येथे पोहोचले. याच ठिकाणी गोदेकाठी त्यांनी तपश्चर्या सुरू केली. याच ठिकाणी त रामनामाचा जप करत होते. दररोज सकाळी संगमातील पाण्यात उभे राहून ते रामनामाचे स्मरण करत होते, असे कुलकर्णी सांगतात.
Hanuman Jayanti 2025: हनुमानांनी सूर्याकडे झेप घेतली, तो अंजनेरी डोंगर पाहिला का?
शिष्यांना सोडून देशभ्रमंती
समर्थ रामदास यांचे त्या काळात अनेक अनुयायी देखील होते. उद्धवस्वामी हे सर्वात लहान वयाचे बालकदेखील त्यांचे शिष्य होते. समर्थांनी या ठिकाणी बारा वर्षे रामनामाचे पुरश्चरण केले. पण जेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितले की, मी आता देशभ्रमंती करायला जाणार, त्यावेळी सर्व शिष्यांना दु;ख झाले. त्यात उद्धवस्वामी यांनी तर समर्थांच्या पायाला मिठी घालून ‘मला सोडून जाऊ नका, तुम्हीच माझे माता-पिता आणि पालक आहात, मी कुणाकडे बघू’, असे म्हटले.
समर्थांनी बनवला गोमयाचा मारुती
समर्थांनी त्याच स्थानावर गोमय अर्थात गायीचे शेण आणि माती यांच्या मिश्रणातून पहिली हनुमानाची मूर्ती स्थापन केली. ‘ही मूर्तीच आता तुझा प्रतिपाळ करेल, तू या मूर्तीचीच उपासना कर’, असे सांगून ते तीर्थाटनाला गेले. ते स्थानच आता नाशिकमधील प्रख्यात टाकळीचे हनुमान मंदिर आणि समर्थ रामदास स्वामींचा मठ म्हणून प्रसिद्ध आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
11 मारुतीत गणना नाही
समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींमध्ये या मारुतीची गणना होत नाही. मात्र, समर्थांनी स्थापन केलेली हनुमानाची पहिली मूर्ती म्हणून भाविकांची तिथे नेहमीच गर्दी असते. टाकळी हे गाव आता नाशिक महानगराचाच भाग आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या या मारुती मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात आणि साकडे घालतात. मारुती त्यांची मनोकामना पूर्ण करतो असे श्रद्धाळू सांगत असतात. याच ठिकाणी समर्थ रामदासांनी 13 कोटी राम नामाचा जप केल्यामुळे आणि त्या नंतर गायत्रीचे 12 वर्ष पुरश्चरण केल्याने या मारुतीमध्ये समर्थांची संपूर्ण शक्ती असल्याचे सांगितले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





