युएसएची बॅटिंग गडगडत असताना शुभम रांजणे हा एकटा पाकिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण करत होता. शुभम रांजणेने 30 बॉलमध्ये 170 च्या स्ट्राईक रेटने 51 रन केल्या, ज्यात 3 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. शुभम रांजणेने शाहिन आफ्रिदीच्या 18 व्या ओव्हरमध्ये दोन सिक्स आणि एका फोरच्या मदतीने 19 रन काढले.
कोण आहे शुभम रांजणे?
advertisement
31 वर्षांचा शुभम रांजणे हा मूळचा पुण्याचा आहे. सध्या अमेरिकेकडून खेळत असला तरी त्याच्या क्रिकेटचा प्रवास हा महाराष्ट्रातून सुरू झाला. शुभम रांजणेची क्रिकेटची आवड त्याच्या कुटुंबाकडून वारशाने मिळाली. शुभमचे वडील सुभाष रांजणे रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळले, तर त्याचे आजोबा वसंत रांजणे हे भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम मध्यमगती बॉलर होते, असं खुद्द सुनिल गावसकर आणि चंदू बोर्डे म्हणाले आहेत.
आजोबा आणि वडिलांच्या क्रिकेटच्या वारशाने प्रेरित होऊन शुभमने वयाच्या 11 व्या वर्षी एज ग्रुप क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आणि त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू केला, यानंतर तो संधी शोधत मुंबईमध्ये आला. शुभम रांजणेने डीवाय पाटील क्लबमध्ये भारताचा माजी फास्ट बॉलर एबी कुरुविला याच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि तो मीडियम फास्ट बॉलिंग ऑलराउंडर बनला. यानंतर त्याने 2016-17 च्या मोसमात मुंबईच्या टीममध्ये पदार्पण केले. जिथे त्याला सूर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूंचा सामना करण्याची संधी मिळाली.
प्रतिभा असूनही रांजणेला मुंबईच्या टीममध्ये मर्यादित संधी मिळाली, त्यामुळे तो गोव्याकडून खेळायला गेला, पण तिथे त्याला यश आलं नाही. अखेर 2022 साली शुभम रांजणेने मेजर क्रिकेट लीग (एमएलसी) मध्ये खेळण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. शुभमच्या या निर्णयाला त्याची पत्नी आणि सूर्यकुमार यादवसह मित्रांनीही प्रोत्साहन दिलं.
युएसएमध्ये रांजणेने नवीन वातावरणाशी जुळवून घेतलं. एमएलसीमध्ये त्याने टेक्सास सुपरकिंग्जचे प्रतिनिधीव्त केलं आणि तो टीमच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक बनला. फाफ डु प्लेसिस आणि एल्बी मॉर्कल यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत संबंध आल्यामुळे रांजणेचा खेळ सुधारायला मदत झाली. रांजणेचा फिटनेस, पॉवर हिटिंग आणि टेकनिकमध्ये सुधारणा झाली.
एक वर्तुळ पूर्ण
मेजर लीग क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे शुभम रांजणेला टी-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेच्या टीममध्ये स्थान मिळालं. वर्ल्ड कपमध्ये रांजणे भारताविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला आणि त्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं.
