२१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आता पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हप्ता होळीपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, यासाठी काही अटी पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
२२ व्या हप्त्यासाठी सरकारचे नवे नियम
advertisement
सरकारने पीएम-किसान योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी काही महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. या बदलांनुसार, २२ वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि शेतकरी आयडी या दोन गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
ई-केवायसी प्रक्रियेत आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी येतो आणि त्याच्या पडताळणीनंतर केवायसी पूर्ण होते. याशिवाय, प्रत्येक लाभार्थ्याचा स्वतंत्र शेतकरी आयडी तयार करणे किंवा आधीचा आयडी अपडेट करणे आवश्यक आहे.
जर यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण राहिली, तर २,००० रु चा हप्ता थेट थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे वेळेत ही कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जमीन व वैयक्तिक माहिती अचूक असणे गरजेचे
केवळ ई-केवायसी पुरेशी नसून, शेतकऱ्यांची जमीन नोंद, आधार क्रमांक, बँक खाते आणि संपर्क माहिती अचूक असणेही तितकेच आवश्यक आहे.
जमिनीच्या नोंदी योग्य प्रकारे जोडल्या नसतील, आधार-बँक लिंकिंगमध्ये अडचण असेल किंवा मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर लाभार्थ्याची माहिती पडताळणी प्रक्रियेत अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत हप्ता उशिरा मिळण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता असते.
२२ वा हप्ता नेमका कधी मिळणार?
आतापर्यंत कृषी मंत्रालयाने २२ व्या हप्त्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सरकारी सूत्रे आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हप्ता १ ते ३ मार्चदरम्यान किंवा ४ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
होळीच्या सणाआधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार हा हप्ता लवकर वितरित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
हप्ता वेळेत आणि अडथळ्याविना मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. पीएम-किसान पोर्टल (pmkisan.gov.in) वर जाऊन ओटीपी-आधारित ई-केवायसी पूर्ण करावी.
ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया अवघड वाटते, त्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन मदत घ्यावी. शेतकरी आयडी तयार आहे का? बँक खाते आधारशी लिंक आहे का? आणि वैयक्तिक माहिती अद्ययावत आहे का, याची खात्री करून घ्यावी.
