मुंबई : भाजपने नवी दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांची परिषद बोलावली होती, या परिषदेमध्ये पहिल्या रांगेत सर्व मुख्यमंत्री असतील अशी अपेक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना इथं स्थान देण्यात आलं. फडणवीस माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री. तरी त्यांना इथं स्थान दिलं गेलं, यामुळे राजकीय चर्चा सुरु झालीये. राज्य विधानसभा निवडणूक फक्त तीन महिन्यांवर आलीये. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुतीचा चेहरा कोण असेल? कोणच्या पाठीशी ताकद भाजपकडून दिली जाईल? हा प्रश्न राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी होता. आता हळूहळू चित्र स्पष्ट होतंय. पुण्यातील अमित शहांच्या सभेत याचे संकेत देण्यात आले होते. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांचं स्थान निश्चित करण्यात आलं.
advertisement
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्रीत अमित शाह यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद घेतली. या परिषदेत फडणवीसांना पहिल्या रांगेत बसवण्यात आलं होतं. महायुतीत शिंदे गट आणि पवार गटात मोठी रस्सीखेच आहे. जागा वाटपात अंतिम निर्णय कोणाचा राहिल? याबद्दल साशंकता होती. आगामी विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार असल्याचं स्पष्ट होतं.
फडणवीसांसाठी प्रोटोकॉल तोडला
भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात महत्त्वाची परिषद पार पडली. यात देशभरातील मुख्यंत्र्यांना बोलवण्यात आलं होतं. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे संघटक महासचिव बी. एल. संतोष उपस्थित होते. शिवाय देशभरातील भाजप सरकारातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर होते. 27 आणि 28 जुलैला ही परिषद पार पडली. यात प्रोटोकॉल तोडून फडणवीसांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं. याचे फोटो आता व्हायरल होत आहेत. भाजप केंद्रीय नेतृत्त्वाला यातून संदेश द्यायचा आहे. विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रं फडणवीसांच्या हातीच असतील हा संदेश आहे. लोकसभा निवडणुकीचा पराभव फडणवीसांनी स्वीकारला होता. मंत्री पदावरुन मुक्त करावं, पक्ष संघटनेच्या कामासाठी ताकद द्यावी. अशी मागणी केली होती. तेव्हाही केंद्रीय नेतृत्त्वाने हा निर्णय स्वीकारला नव्हता. लोकसभेच्या पराभवाचा वचपा फडणवीसच काढतील, असा विश्वास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आहे.
मुख्यमंत्र्यांचं सादरीकरण
मुख्यमंत्री परिषदेत मुख्यमंत्र्यांनी भारताच्या विकासाचं व्हिजन मांडलं. प्रमुख प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीचे उपाय ही सांगितले. या बैठकीत हेमंत बिस्वा शर्मा यांनी नोकर भरतीचा महत्त्वाचा विषय हाताळला. या विषयावर त्यांनी प्रेजेंटेशन सादर केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या बैठकीला उपस्थित होते. योगींना सरकारातून हटवण्यासाठी युपी भाजपचे प्रयत्न सुरु होते, मात्र मोदी शहांनी योगींवर विश्वास कायम ठेवला. योगींनी या परिषदेत सादरीकरण केलं. युपीची अर्थव्यवस्था वन ट्रिलियनवर नेणं, ग्रामसचिवालयांचं डिजीटलायझेशन मुद्दे हाताळले. या दिशेने प्रभावी काम करण्यासाठीचा रोडमॅप त्यांनी सादर केला.
जरांगे विरुद्ध फडणवीस
सप्टेंबर 2023 मध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला. मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळी लाठीचार्ज झाला होता. फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यामुळे फडणवीसांना जबाबदार धरण्यात आलं. जरांगेंनी वारंवार फडणवीसांचं नाव घेतलं. फडणवीसांवर टीका केली. फडणवीसांवरील राग महायुतीवर मतदारांनी काढला, असं नेरिटव्ह पुढं केलं जात होतं. लोकसभेत फडणवीसांनी तुफान सभा घेतल्या. जागा वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली. बंडखोरी रोखण्यासाठी अनेक जागांवर मध्यस्थी केली. लोकसभेत महायुतीच्या ड्राईव्हिंग सीटवर फडणवीस होते. महायुतीच्या पिछेहाटीसाठी थेट फडणवीसांना जबाबदार धरण्यात आलं. केंद्रीय नेतृत्त्व त्यांचे पंख छाटणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याऐवजी अधिकची ताकद दिली जात आहे.
फडणवीसकेंद्री नवी रणनीती
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात होते. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शहांच्या भाषणानंतर फडणवीसांनी भाषण केलं. खोटं नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी ताकदीने मैदानात उतरा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. जरांगेंना उत्तर देण्यासाठी चार प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आलीये. पंकजा मुंडेंना विधानपरिषद देण्यात आली. फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर जरांगेंवर तुटून पडत आहेत. मराठा आंदोलनात भाजपने बचावात्मक पवित्रा घेतला, यामुळे जरांगेंच्या आरोपांना ताकद मिळाली. असं विश्लेषण केलं जातंय. यानंतर आता भाजप गिअर बदलण्याच्या तयारीत आहे, भाजपची ही बदलेलली रणनीती फडणवीसांना ताकद देते आहे.