उद्धव ठाकरे यांची सावलीसारखी साथ देणारे मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिले. खरंतर ठाकरे गटाकडे 16 आमदारांचं संख्याबळ आहे. पण तरीही ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवार देण्यात आली. मुळात मिलिंद नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपच्या सर्वच आमदारांच्या चांगल्याच ओळखीचे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. आधीच्या शिवसेनेच्या सर्वच आमदारांचा त्यांच्याशी जवळीक संबंध होता. एवढंच नाहीतर भाजपमधील अनेक नेते आणि आमदार सुद्धा नार्वेकरांच्या संपर्कात कायम असतात. त्यामुळेच नार्वेकरांच्या विजय कसा होईल, हे त्यांच्या संपर्कावरून जवळपास गणित निश्चित झालं होतं.
advertisement
जेव्हा नार्वेकरांनी अर्ज भरला तेव्हा भाजपच्या नेत्यांसोबत बोलताना आणि चर्चा करताना आढळून आले होते. त्यामुळे तेव्हापासूनच कुजबूज सुरू झाली होती. विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री सुद्धा नार्वेकरांच्या एंट्रीमुळे जवळ आले होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात सुद्धा नार्वेकर यांच्याबद्दल हळवा कोपरा आहे. त्यामुळेच याचा फायदा हा नार्वेकरांना झाला, असं मानलं जात आहे. पहिल्या फेरीचे मतदान सुरू झाले तेव्हा नार्वेकर १७ मतं घेऊन आघाडीवर होते. त्यानंतर अचानक गेम पलटला आणि आकडेवारी तिथेच थांबली. तोपर्यंत भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मतांची मोजणी झाली. महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले होते. तर अजितदादा आणि शिवसेनेचे उमेदवारही विजयी झाले. त्यामुळे आता शेकापचे जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. अखेरीस मिलिंद नार्वेकर हे 24 मतांनी विजयी झाले. शेकापच्या जंयत पाटील यांना राष्ट्रवादीच्या 12 मतांव्यतिरिक्त इतर मतं मिळाली नाही, असं दिसून येत आहे. कारण त्यांची मताची गाडी ही 12 वर येऊन थांबली.
आता विधान परिषदेमध्ये आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा दिसणार आहे. नार्वेकरांच्या विजयामुळे भाजप आणि ठाकरे गटामध्ये चर्चेचं दार मोकळं होणार हे आता पाहण्यासारखं ठरणार आहे.