माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
(ज्ञाने – ६.१४)
माऊलींच्या इतकेच प्रतिभावंत संत म्हणजे संत एकनाथ महाराज. महाराष्ट्रात भागवत धर्माला आधार देऊन त्यांनी भागवत धर्माची ध्वजा फडकवत ठेवली. १६ व्या शतकातील नाथांच्या काळातली परिस्थिती फारच बिकट होती. पारतंत्र्याच्या झळा सहन करणारा महाराष्ट्र अनाथ झाल्यासारखा झाला होता. या अनाथ झालेल्या महाराष्ट्राला आपल्या वाणीने आणि लेखणीने त्यांनी सनाथ केले. भागवत धर्माचा संदेश त्यांनी समाजाच्या सर्व थरात पोहोचवला. नाथांचा लेखनप्रपंच फारच मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे. एकनाथी भागवताबरोबर चतु:श्लोकी, शुकोष्टक, हस्तामलक, आनंदलहरी, स्वात्मसुख, रुक्मिणी-स्वयंवर, भावार्थ रामायण, अनुभवामृत, आनंदानुभव, चिरंजीवपद, गीतासार, ध्रुव-प्रल्हाद-ज्ञानदेव-नामदेव इत्यादी संतांची चरित्रे असे त्यांचे वाङमय प्रसिद्ध आहे. त्यांनी तीन हजारांच्या आसपास अभंग व पदे आणि साडेतीनशेच्या आसपास भारुडे असे वाङमय निर्माण केले. इतकी वैविध्यपूर्ण वाङमय निर्मिती नाथांनी केली असताना, नाथांचे नाव घेतले की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे रहाते ते म्हणजे ‘नाथांचे भारुड.’
advertisement
तसे पाहायला गेले तर भारुड हा वाङमय प्रकार नाथांच्या आधीही प्रचलित होता. ज्ञानेश्वर माऊलींसहित अनेक संतांनी भारुड हा प्रकार हाताळला आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी भारुड हा प्रकार सर्वप्रथम हाताळला असे मानले जाते. त्यानंतर नामदेव महाराज व इतर सर्व संतांनी आपापल्या परीने त्यात भर घातली. पण नाथांच्या इतकी वैशिष्ठ्यपूर्ण भारुडे इतर कोणी लिहिली नाहीत. त्यांनी लोकोद्धाराच्या तळमळीमुळे भारुडे लिहिताना निरनिराळे लौकिक छंद वापरले. नाथांच्या भारुडात भागवत धर्मातील सदाचार, सर्वांभूती भगवंत पाहण्याचा भागवतभाव आणि विवेकाची शिकवण हे सारे पदोपदी आढळून येते. रोजच्या जीवनात दिसून येणाऱ्या, घडून येणाऱ्या गोष्टी नाथांनी भारुडांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने मांडून समाजाला भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या भारुडामध्ये ‘सदाचार आणि नीती’ यावर भर दिला आहे. सर्वसामान्यांना कळेल अशी भाषा, त्यांना पेलवेल असे तत्त्वज्ञान त्यांच्या भारुडातून दिसून येते. प्रचलित लोकगीते आणि भारुड या रचना दिसायला एक सारख्याच दिसतात. त्यामुळे लोकगीतांप्रमाणे भारुडेही मौखिक परंपरेने लोकजीवनात चालत आली असावीत असे वाटते.
मंडळी, आम्ही अत्यंत अल्पमती आहोत. “भारुडाचे गारुड” हे फारच मोठे शिवधनुष्य पेलण्याचा हा संकल्प आम्ही सोडला आहे. भारुड या संकल्पनेतील रुपकांचा अर्थ समजून घेणे हे फार मोठे अग्निदिव्य आहे. जोपर्यंत त्या रुपकांचा अर्थ लागत नाही तोपर्यंत भारुडाचा खरा गर्भितार्थ लक्षात येत नाही. नाथांनी भारुडात वापरलेली रुपके ही त्याकाळच्या रोजच्या समाजरचनेत आढळून येणारी रुपके होती. या रुपकांचे एकत्रित समायोजन करुन त्यांनी त्याकाळच्या समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. परकीय आक्रमणामुळे विस्कटलेल्या समाजव्यवस्थेला देवाचे, भगवंताचे, नामसंकीर्तनाचे अधिष्ठान देऊन भागवत धर्माची पताका फडकवत ठेवण्याचा प्रयत्न केला. नाथांच्या भारुडांचा परामर्श घेणे किंवा अर्थ सांगणे यासाठी अंगात अजून फार मोठी पात्रता येणे आवश्यक आहे, हे आम्हास ठाऊक आहे. या जन्मात इतके ज्ञान आमुच्या पदरात पडावे म्हणून आम्ही दिवसरात्र प्रार्थना करतो. इथे आज आम्ही केवळ नाममात्र संकलक आहोत. इथे सादर केलेले ज्ञान हे केवळ इतर मान्यवरांच्या लेखनातून संकलन करुन आपणासमोर आणले आहे. जे काही लिहून सादर केले आहे त्यात आमचे विशेष काहीही योगदान नाही. हे सगळे माऊलीने घडवून आणले आहे असे आम्ही मानतो. हा परामर्श घेताना कोणाचाही उपमर्द करण्याचा कोणताही हेतु या लिखाणात नाही. काही चुकभूल झाली तर माऊलीच्या ममतेने पांघरुण घालावे, ही विनंती.
आपल्या ‘भारुडाचे गारुड’ या लेखमालेची सुरुवात आपण माऊलींनी रचलेल्या ‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे’ या भारुडाने करु या.
काट्याच्या अणीवर, वसली तीन गावे l
दोन ओसाड, येक वसेचीना ll१ll
वसेचीना तेथे आले, तीन कुंभार l
दोन थोटे, येक घडेचीना ll२ll
घडेचीना त्याने घडली, तीन मडकी l
दोन कच्ची, येक भाजेचीना ll३ll
भाजेचीना त्यात रांधले, तीन मुग l
दोन हिरवे, येक शिजेचीना ll४ll
शिजेचीना तेथे आले, तीन पाहुणे l
दोन रुसले, येक जेवेचीना ll५ll
जेवेचीना त्याला मारल्या, तीन बुक्क्या l
दोन हुकल्या, येक लागेचीना ll६ll
ज्ञानदेव म्हणे, याचा तो अनुभव l
सदगुरु वाचुन, कळेचीना ll७ll
आत्मज्ञान व्हायचे असेल तर सद्गुरुशिवाय पर्याय नाही हे माऊलींनी या भारुडात निरनिराळी रुपके योजून सांगितले आहे. विश्वाचा पसारा हा पांचभूतात्मक निर्मित आहे. जी गोष्ट निर्मित आहे त्याचा अंत अटळ आहे. म्हणूनच या विश्वाचा पसारा हा नाशवंत आहे. कालचक्राने मर्यादित आहे.
काळ्या मिरीच्या या उपायाने शनिदेवाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती, नशीब होईल बलवान
काट्याच्या अणीवर, वसली तीन गावे l
दोन ओसाड, येक वसेचीना ll१ll
पृथ्वीतलावरचा प्रत्येक जीव कालचक्राच्या फेऱ्यातून जात असतो. या काळ नावाच्या काट्याच्या अणीवर म्हणजे टोकावर मानव देहाची तीन गावे वसली आहेत. वसलेली ही तीन गावे म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि लिंग देह . स्थूल देह व सूक्ष्म देह हे दोन्ही देह नाशवंत आहेत, ते नष्ट होत असतात, आणि म्हणूनच ते दोन्ही देह ओसाड आहेत असे माऊली म्हणतात. तर लिंगदेह हा आपल्याला अनाकलनीय आहे. त्याचे अस्तित्व कळून येणे कठीण आहे म्हणून त्याला वसेचिना असे म्हटले आहे.
वसेचीना तेथे आले, तीन कुंभार l
दोन थोटे, येक घडेचीना ll२ll
न वसणाऱ्या या गावात आलेले तीन कुंभार म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त. मानवी अंत:करणाचे संकल्प-विकल्पात्मक स्वरुप मन आहे. केलेला संकल्प तडीस नेण्याचे काम मनाच्या दृढतेवर अवलंबून असते. अंत:करणाचे निश्चयात्मक स्वरुप आहे बुद्धी, सारासार विचार करुन केलेले संकल्प पार पाडण्याचे काम बुद्धी करत असते. आणि या अंत:करणाचे एकाग्र वृत्तीधारक स्वरुप म्हणजे चित्त. माणसाच्या चंचल वृत्तीने कितीही प्रयत्न केला तरीही मन आणि बुद्धी कोणतेही निश्चयात्मक काम करायला असमर्थ ठरतात म्हणून त्या दोन्ही कुंभारांना थोटे कुंभार म्हटले आहे. आणि नामस्मरण केल्याशिवाय चित्ताची एकाग्रता होणे कठीण असते. अनेकविध कारणाने मानव नामस्मरण करण्याचे टाळत असतो त्यामुळे चित्त एकाग्र करण्यात येणारी असमर्थता म्हणजेच हे मडके घडविण्यातली असमर्थता, म्हणून हे मडके घडेचिना.
घडेचीना त्याने घडली, तीन मडकी l
दोन कच्ची, येक भाजेचीना ll३ll
प्रत्येकाला जीवनात केलेल्या कर्माचे फळ मिळत असते. ही कर्मे म्हणजे संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्मे . या कुंभाराने संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्मे अशी तीन मडकी घडवली आहेत. यापैकी संचित कर्मे ही प्रत्येकाला भोगायची आहेत, त्यातली किती भोगली, किती अजून भोगायची आहेत हे कोणालाच माहीत नाही, प्रारब्ध कर्माचेही तसेच आहे. काही भोगली आहेत व काही भोगायची बाकी आहेत. म्हणून ही दोन्ही कर्मे म्हणजे दोन मूग अपक्व आहेत. शिल्लक राहिले क्रियमाण कर्म. वर्तमानकाळात करत असलेली ही कर्मे योग्य रीतीने केली नाही तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. ही कर्मे करत असताना आपल्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून करायला हवीत. करत असलेली क्रियमाण कर्मे बुद्धीरुपी अग्नित भाजून घेतली पाहिजेत तरच ती पक्व होतील. परंतु हा सदासद्विवेक न वापरताच मानव कर्म करत असतो, म्हणून क्रियमाण कर्म भाजत नाही.
भाजेचीना त्यात रांधले, तीन मुग l
दोन हिरवे, येक शिजेचीना ll४ll
या मडक्यात रांधलेले तीन मूग म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात येणारे तीन काळ आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य हे काळ प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. व्यतीत झालेला भूतकाळ कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा अनुभवता येत नाही. या काळात केलेली कुकर्मे सुधारता येत नाहीत. आणि येणाऱ्या भविष्यकाळात पुन्हा सत्कर्म घडून येतील याची शाश्वती नाही. सत्कर्माच्या दृष्टीने या दोन्ही काळांचा उपभोग घेता येत नाही त्यामुळे ते मूग हिरवेच आहेत. वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांच्या अधिपत्याखाली घडणाऱ्या घटना आपल्या हातात नसतात त्यामुळे वर्तमानकाळ हा कधी संपत नाही. यात घडणारी कर्मे त्यामुळे शिजतच नाही.
शिजेचीना तेथे आले, तीन पाहुणे l
दोन रुसले, येक जेवेचीना ll५ll
या सर्व घटनांचे उत्तरदायित्व हे प्रत्येक व्यक्तीचे असते. केलेल्या कर्माची फळे प्रत्येकाला भोगावी लागतात. प्रत्येक जीवाला कर्माच्या या फेऱ्यातून जावे लागते. प्रत्येकाच्या कर्माचे हे तीन पाहुणे म्हणजे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक जीव इथे जीवाला पाहुणा म्हणण्याचे कारण म्हणजे पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक मानवी देह हा या जगातला पाहुणाच आहे. जोवर पृथ्वीतलावर त्याचा कार्यकाल आहे, तेवढाच काळ तो पृथ्वीतलावर रहातो. जीवनात आध्यात्मिक आणि आधिदैविक जीवांचा उद्धार व्हावा म्हणून आपण काहीही काम करत नाही. त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही म्हणून हे दोन पाहुणे रुसले असे म्हटले आहे. तिसरा पाहुणा म्हणजे आधिभौतिक देह, म्हणजे आपले भोग उपभोगण्याचे साधन. हे भोग उपभोगताना आपण आपल्या मनातल्या आशा, चिंता ही कारणे पुढे करुन आपले भोगायचे भोग टाळायचा प्रयत्न करत असतो. प्रारब्धात असलेले भोग गोड मानून भोगत नाही म्हणून हा तिसरा पाहुणा जेवेचिना.
जेवेचीना त्याला मारल्या, तीन बुक्क्या l
दोन हुकल्या, येक लागेचीना ll६ll
उशीला कवटाळून झोपणाऱ्यांचा असा असतो स्वभाव, झोपण्याच्या या 5 पोझिशन्सवरून जाणून घ्या
मानवाचा अहंकार ही फार मोठी गोष्ट आहे. या अहंकारापुढे इतर कोणतीही गोष्ट चालत नाही. प्रत्येक मानवाला आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक ताप सहन करायला लागतात. आध्यात्मिक आणि आधिदैविक ताप सहन करताना मानव अहंकाराने याचे खापर इतर गोष्टींवर फोडतो, म्हणून या दोन बुक्की हुकून जातात असे माऊली म्हणतात. मनात निर्माण झालेल्या अहंकाराने मानव इतका निर्ढावतो की त्याला सहन करायला लागणाऱ्या आधिभौतिक दु:खांचे काही वाटत नाही. आपण केलेल्या कुकर्माचे हे फळ आहे असे त्याला वाटतच नाही म्हणून ही तिसरी बुक्की त्याला लागतच नाही.
ज्ञानदेव म्हणे, याचा तो अनुभव l
सदगुरु वाचुन, कळेचीना ll७ll
आयुष्यात जे सुख-दु:ख आपण भोगतो याचे कारण आपण केलेली कर्मे आहेत हे मानवाला कळतच नाही. हे सगळे लक्षात येण्यासाठी प्रत्येकाला आयुष्यात एका गुरुची गरज आहे. आयुष्याचे हे सार कळण्यासाठी सदगुरुंचा अनुग्रह होणे आवश्यक आहे. त्यांच्या कृपेशिवाय हे ज्ञान मिळणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच सद्गुरुंना शरण जा, म्हणजे तुमच्या आयुष्याचे सार्थक होईल असे माऊली सांगतात.
डॉ नरेंद्र भिकाजी कदम, लेखक