मित्रांनो, आषाढातला आजचा पहिला दिवस; ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणणाऱ्या कालिदासाची आठवण आपल्याला नेहमीच करुन देतो. त्यांच्या असामान्य प्रतिभेने साकारलेल्या मेघदूत महाकाव्यातल्या या ओळी,
तस्मिंनद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ:|
आषाढस्य प्रथम दिवसें मेघमाश्लिष्टसानुं
वपक्रीडा परिणतगजपेरक्षणीयं ददर्श ||
अन कवी कुसुमाग्रजांनी केलेले त्याचे मराठी भाषांतर,
कृश हातातून गळून पडले सोन्याचे कंकण
advertisement
कामातुर हो ह्द्यगामिनी राहीली दूर पण
आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतापरी
नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रिडांगण
रचनेच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता, तितक्याच उत्कट शब्दांत मांडलेले हे रुप म्हणजे मराठी भाषेचा अप्रतिम अलंकारच आहे. अन ती कवी कुसुमाग्रजांची प्रतिभा आहे. एकापेक्षा एक प्रतिभावंत कवी या मातीत जन्माला आले. एकाला झाकावे अन दुसऱ्याला काढावे, प्रतिभा कुठेही कमी पडणार नाही.
आज हे सगळं सांगण्याचे कारण म्हणजे
' माझा मराठाचि बोलू कौतुके । परि अमृतातेहि पैजासी जिंके । '
असे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी निर्माण केलेली मराठी अस्मिता आजही ताठ मानेने मराठीची ध्वजा अभिमानाने फडकवत ठेवत आहे. या मातीने एकापेक्षा एक दिग्गज लेखक, कवी दिले. भागवत परांपरेची गुढी खांद्यावर घेऊन निघालेल्या संतांच्या पावलावर पाऊल टाकून आजही मराठीचा हा अभिमान डौलाने डोलतो आहे.
माऊली ज्ञानेश्वर यांच्या प्रतिभेला साजेशा प्रतिभेने संतांनी अनेक रचना केल्या. त्यातील ‘भारुड’ या रचनेतील वैविध्यांची आपण अनुभूती घेतो आहोत. नाथांची काव्य प्रतिभा त्यांनी निर्माण केलेल्या अफाट ग्रंथ निर्मितीतून दिसून येते.
काल आपण संत जनाबाईंची रचना पाहिली.
‘खंडेराया तुज करिते नवसू | मरु दे रे सासू खंडेराया ||’
असे आळवत भगवंताच्या चरणी लीन व्हायची इच्छा असणाऱ्या सासुरवास भोगणाऱ्या स्त्रीच्या मनातली तळमळ अनुभवली. काळ कोणताही असला तरी सासुरवास भोगणाऱ्या स्त्रीचे दु:ख फार काही बदलत नाही. संत जनाबाई नंतर जवळपास तीनशे वर्षांनी नाथांनीही याच विषयाला धरुन एक अप्रतिम भारुडाची रचना केली. जनाबाईंच्या भारुडातल्या विवाहितेच्या भावना आणि नाथांच्या विवाहितेच्या भावनांमध्ये कुठेच फरक जाणवत नाही. थोड्याफार शब्दांचा इकडे तिकडे फरक दिसला तरी दोघींच्या मनातले शल्य तेच आहे. आणि या शल्याचे निराकरण करण्याचा मार्गही एकच आहे. परमेश्वराच्या चरणी लीन होण्याची इच्छा असलेल्या भक्तांनी आपल्या मनातले अहंकार, अभिमान इत्यादी दुर्गुण सोडल्यानंतरच सद्गती प्राप्त होते.
ही दोन्हीही भारुडे अनेक रुपकांनी सजलेली आहेत. भारुडाचा प्राण या रुपकात असतो हे आपण जाणताच. या दोन्ही भारुडात सासुरवाशीण स्त्री निरनिराळ्या रुपकांचा वापर करुन परमार्थाची कास धरण्याची आपली इच्छा देवाकडे प्रकट करत आहेत. जनाबाईंच्या स्त्रीने नवस केला आहे तर नाथांची स्त्री भवानी आईला सरळसरळ रोडगा वहाण्याचे आमिष दाखवते आहे. दोघींच्या मनात देवाच्या चरणी लीन व्हायचे आहे पण संसारतील अनेक अडथळे त्यांना तसे करण्यापासून रोखत आहेत. सूनेच्या मनात सासुरवाडीच्या लोकांवर खदखदणाऱ्या रागाचा उपयोग करुन दोन्ही संतांनी अजरामर रचना करुन ठेवली आहेत.
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥५॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥६॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥७॥
लग्न करुन आलेल्या प्रत्येक स्त्रीला सासरी जुळवून घेताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. एकत्र कुटुंबात असलेल्या इतक्या सगळ्या मंडळींच्या स्वभावाशी जमवून घेणे ही काय साधी गोष्ट नाही. निरनिराळ्या स्वभावाच्या लोकांशी जमवून घेत असताना स्वत:च्या स्वभावाला मुरड घालावी लागत असते. बऱ्याच वेळेस या अशाच तडजोडी कराव्या लागतात कदाचित यालाच सासूरवास म्हणत असावेत.
सासुरवासाच्या या कल्पनेचा संबंध नाथांनी पारमार्थिक जीवनात येणाऱ्या अडचणींशी जोडला आहे. लग्न झालेल्या स्त्रीला अनेक कारणाने मनाप्रमाणे वागता येत नाही तसेच आपल्या जीवनातही परमार्थाकडे जाण्यापासून रोखणारे अनेक अडथळे आहेत. सासुरवाशीणीला सासरी काहीतरी अडचणी येणार हे ज्याप्रमाणे अध्याहृत आहे तसेच प्रत्येक जीवाला पारमार्थिक जीवनात दु:ख आहेच. तिने जेव्हा सासरच्या या मंडळींना आपले मानले तेव्हा तिने तो त्रास सहन करण्याची तयारी ठेवली. परंतु जेव्हा सद्गुरुंची कृपा झाली. तिला तिच्या मूळ स्वरूपाची जाणीव झाली तेव्हा या सगळ्या गोष्टींना सोडण्याची तिची मानसिक तयारी झाली. तिच्या एकटीच्या तयारीने हे साध्य होणार नाही याची तिला कल्पना आहे म्हणून या सगळ्यांना काहीतरी करुन माझ्यापासून लांब घेऊन जा असे ती भवानी आईला सांगते.
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥
भगवंताच्या चरणांशी लीन व्हायची इच्छा मनात आहे पण या मार्गातले अनेक अडथळे तिला पाऊल उचलायला देत नाहीत. तिला आलेले वैफल्य ती देवीला सांगते आहे. हे भवानी आई, माझे कार्यक्षेत्र केवळ चूल, मूल एवढेच आहे त्यामुळे माझ्या क्षेत्रात असलेल्या गोष्टी मी तुला देऊ शकते. माझ्या हाती असलेल्या पिठाचा केवळ रोडगा बनवून देणे मला शक्य आहे, इतरांसारखा नवस बोलून मोठी भेट देणे मला शक्य नाही.त्यामुळे तु एवढ्यांवरच समाधान मानून माझे म्हणणे तडीस ने. भगवंताला शरण जाणाऱ्याकडे लीनता हे एकमेव साधन असले तरी ते पुरेसे आहे.
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
भागवंतांच्या भेटीची आस असलेल्यांना अनेक अडचणी असतात. त्यातली पहिली अडचण म्हणजे मनातला अहंकार, म्हणजेच या सासुरवाशीणीचा सासरा. मला तुझ्या चरणांशी लीन व्हायचे आहे. माझ्यातला अहंकार मी बाजूला सारते आहे, तो पुन्हा येण्याआधी त्याला बाहेरच्या बाहेर खपवून टाक. माझ्या मनातला अहंकाररूपी सासरा बाहेर गेला आहे, तो बाहेर आहे तोवरच त्याला संपवणे सोपे आहे. माझे एवढे ऐक त्याला तिकडेच खपव.
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥३॥
या अहंकाराला खतपाणी घालण्याचे काम करत असतो तो मनातला वृथा अभिमान. याच्यामुळे मनातला अहंकार कमी होत नाही. हा वृथा अभिमान सतत मला छळत असतो. जशी माझी सासू माझा जाच करते तसा हा मला जाच करतो. आता त्याचे निर्दालन करण्याचे काम तुलाच करायचे आहे. माझ्यातल्या या अभिमानाला नष्ट कर म्हणजे तुझ्या भक्तीत व्यत्यय येणार नाही.
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥४॥
माझ्या मुखातली ही वैखरी वाणी आहे ती माझी जाऊबाई आहे. आपल्या वाणीच्या मुळेच अनेकदा आपल्याला त्रास सहन करायला लागतो. जिथे जे बोलावे तिथे ते बोलले जात नाही आही, नको ते बोलले जाते. या कारणाने परमार्थाला बाधा निर्माण होते. अशा या त्रास देणाऱ्या जावेला तु बोडकी कर, म्हणजे ती जास्त पुढेपुढे करणार नाही. तुझ्या जवळ यायचे असेल तर माझ्या मुखातून चांगलेच विचार यायला हवेत.
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥५॥
लहान पोर म्हणजे मायेचे रुप, त्याच्यावर सगळ्यांचा जीव असतो. त्याने काहीही केले तरी त्याला माफ करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. या माया तत्वामुळे पुन्हा ईश्वरी साधनेत बाधा येते त्यामुळे हे पोर मला त्रासदायकच आहे. त्याला इतर कुठेतरी गुंतवून ठेव. त्याला खरुज होऊ दे, म्हणजे तो दिवसभर आपले हात खाजवत बसेल आणि त्यामुळे माझ्या साधनेत त्याचा त्रास होणार नाही.
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥६॥
काम हा या स्त्रीचा दादला आहे. त्याच्यातल्या अविवेकाने तो बुद्धीहीन असल्यासारखा वागतो. अविवेकाने केलेले कोणतेही काम सफल होत नाही. म्हणून माझ्यातल्या या अविवेकाचा त्याग करायची माझी तयारी आहे. त्याची मी आहुति देणार आहे. ही आहुति दिली की मी या संसाराच्या साऱ्या पाशातून मोकळी होईन आणि तुझ्या चरणांची सेवा करु लागेन.
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥७॥
पारमार्थिक जीवनात येण्यासाठी अडथळा आणणाऱ्या या सगळ्या गोष्टींना तु काढून टाक. मला एकटीच राहू दे म्हणजे मी निर्धोकपणे या मार्गावर चालत राहीन. माझ्यात असलेल्या या सगळ्या दोषांना तु पोटात घे, मला दोषमुक्त कर त्यासाठी मी तुझ्या चरणांशी आलो आहे.