करावा विचार | न लगे चिंता कोनासि ||
वारकरी संप्रदाय हे भागवत धर्माचे व्यापक आणि परमविकासित रुप आहे. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ मानणाऱ्या या वारकरी संप्रदायावर लहान-थोर, उच्च-नीच, स्त्री-पुरुष सगळ्यांचा समान अधिकार आहे असे मानले आहे.
संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशाटण केले. पार पंजाबात जाऊन विपुल ग्रंथ रचना केली. त्यानंतर इतर संतांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. समाजातल्या वर्ण भेदाचा त्रास कमी अधिक प्रमाणात या संतानाही भोगावा लागला होता. उच्च-नीचतेच्या बिनती तोडून स्त्री, शूद्र, अंत्यज, जातीहीन आदी समजल्या जाणाऱ्या समाजातल्या उपेक्षित घटकांना मूळ प्रवाहात आणण्याचे काम नाथांनी केले.
advertisement
जया म्हणती नीच वर्ण | स्त्री शूद्रादी हीन जन ||
सर्वांभूती देव वसे | नीचाठायी काय नसे? ||
सर्वांभूती देव वसतो असे म्हणता; मग ज्यांना नीच म्हटले जाते अशा स्त्री, शूद्र आदी जनांकडे हा देव नाही काय ? असा प्रश्न नाथांनी चारशे वर्षांपूर्वी समाजातल्या ठेकेदारांना विचारला होता. समाजातल्या उच्च-नीच, स्त्री-पुरुष, शूद्र, अंत्यज, जातीहीन या सगळ्यांना त्यांनी त्रैवर्णिंकामध्ये आणण्याचे कार्य नाथांनी केले होते. काशीहून आणलेले गंगाजल त्यांनी पैठणच्या वाळवंटात तहानेने व्याकुळलेल्या गाढवाला पाजले होते हे सगळ्यांना ठाऊकच आहे. सर्वांभूती ईश्वर आहे हे त्यांचे तत्वज्ञान होते. या ईश्वराच्या नामस्मरणाने प्रत्येकाने आपला उद्धार करावा हा विचार ते सतत लोकांपर्यंत पोचवत होते.
त्यांच्या अभंगातून, त्यांच्या प्रत्येक रचनेमधून ते हेच तत्वज्ञान लोकांना देत होते. नाथांनी त्यांच्या भारुडांतून मनोरंजनाबरोबरच अध्यात्म विचारांचीही मांडणी केली आहे. त्यांच्या भारुडात जे तत्त्वज्ञान आहे, ते रूपकात्मक पद्धतीने मांडलेले आहे. नाथांचा काळ अत्याचारी राज्यकर्ते, अनाचार आणि राजकीय अस्थैर्य असा होता. गुंडगिरी वाढली होती आणि दुष्ट प्रवृत्ती, विषयवासना, अज्ञानतेने होणारी अवनती यांमुळे एकनाथ हळहळतात. ब्राह्मणांनी तसेच अन्य लोकपुरोहितांनी कर्मठपणा वाढविला होता. त्याचे दर्शन एकनाथांच्या भारुडात प्रत्ययास येते, ते असे–
कोणासी न कळे अवघे जहाले मूढ | म्हणती हे गूढ वाया शास्त्र ॥
आपुलाला धर्म नाचरती जनी | अपीळ धरणी पीक न होय ॥
त्यावेळचा समाज बुवाबाजीने गांजलेला होता, दारिद्र्याच्या जात्यात भरडला जात होता, आपापसातील भेदाभेदाने भंगला होता. समाजाला या समस्येतून बाहेर काढून नाथांना या समाजाचे स्वास्थ्य राखायचे होते. आजूबाजूच्या परिस्थितीवर उतारा म्हणून त्यांनी सरळसरळ कडकलक्ष्मीला साकडे घातले. “बये दार उघड” असे म्हणून तिला आवाहन केले. समाज बघ कसा भरकटला आहे. गावगाड्यामध्ये मोठा अहंकार माजलेला आहे, बहुजनांमध्ये आणि महाजनांमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आहे, रयतेला लोक लुटतात, अत्याचाराने, भ्रष्टाचाराने, दुराचाराने सगळा समाज पोखरला. आता तू दैवी शक्तीने प्रकट होणे गरजेचे आहे, म्हणून बये दार उघड, दार उघड. म्हणजे तुझे निरूपणाचे दार जे लावले आहे, ते उघड आणि सगुणात प्रकट हो.
नमो निर्गुण निराकार | मूळ आदिमाया तूं साकार ||
घेउनि दहा अवतार | करिसी दुष्टांचा संहार ||
दार उघड, बया दार उघड ||
दैत्यकुळी हिरण्यकश्यपु जन्मला | तेणे तुझा भक्त गांजिला ||
तें न पाहवें तुजला | त्वा उग्ररूप धरिलें ||
तेव्हा क्रोधें स्तंभ फोडून | नारसिंहरूप धरून ||
दैत्यासी वधून | प्रल्हाद दिवटा रक्षिला ||
बया दार उघड | दार उघड ||
तत्कालीन समाजाचे नाथांचे अध्ययन फारच सूक्ष्म होते. माणसातल्या गुणदोषांना जाणून घेण्याची अफाट बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यांनी भरपूर प्रवास केला होता, त्यामुळे त्यांनी त्यांना आलेला सगळा अनुभव त्यांच्या भारुडात अत्यंत उत्तम रित्या गुंफला. प्रपंच आणि परमार्थ एकत्रित रित्या साधने हे फार जिकरीचे काम आहे. हे साधत असताना माणसाची उडणारी त्रेधातिरपीट त्यांनी भारुडातून मांडली. लौकिक आणि पारलौकिक गोष्टींचा योग्य मेळ एकनाथांनी भारुडात साधला. त्यांच्या प्रतिभेची प्रचिती डॉ. रामचंद्र देखणे यांनी लिहिलेल्या 'भारूड आणि लोकशिक्षण' या ग्रंथातून येते. ढोंगी समाजावर कोरडे ओढत असताना भक्तांसाठी प्रबोधनात्मक दृष्टिकोन व लोकशिक्षण हा हेतु मनात ठेवताना मानवाच्या वेगवेगळ्या व्यंगांवर टिपणी करुन नामस्मरणाचा संदेश त्यांनी दिला आहे. हे सांगत असताना त्यांनी आंधळा, मुका, बहिरा, पांगळा अशी निरनिराळी व्यंगे घेऊन भारुडे लिहीली.
बहिरा जालो या या जगी ॥धृ.॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बहिरा झालो त्यागुन ॥१॥
नाही संतकीर्ति श्रवणी आली । नाही साधूसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनी त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा जालो नरदेही येता । एका जनार्दनी स्मरे न आता ॥३॥
नाथांनी भारुडात वर्णन केलेला हा कानाने ऐकू येत असूनही बहिरा आहे. ईश्वराने मानवाला जी इंद्रिये दिली आहेत त्याचा उपयोग परमात्म प्राप्तीसाठी न करता विषयलोलुपतेने ऐहिक विषयाच्या सेवणाकरिता राबवली की ती असून नसल्यासारखीच असतात. या उद्देशाने नाथांनी बहिरा हे भारुड लिहिले आहे.
बहिरा जालो या या जगी ॥धृ.॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बहिरा झालो त्यागुन ॥१॥
नाथांचा बहिरा आपली कैफियत मांडताना म्हणतो, मित्रांनो मी बहिरा झालो त्याचे कारण समजून घ्या, म्हणजे मी केलेली चूक तुम्ही करणार नाही. प्रत्येक माणसाच्या प्रारब्धावर त्याच्या पूर्वकर्मांचा, संचित कर्माचा प्रभाव पडत असतो. माझ्या कोणत्याही जन्मात मी कधी हरिकीर्तन ऐकले नाही की मी पुराणांचे श्रवण केले नाही. इतकेच नव्हे तर मी कधीही वेदशास्त्राचेही पठण केले नाही त्यामुळे मी आईच्या गर्भात असल्यापासूनच बहिरा झालो आहे. या जन्मात म्हणा किंवा पूर्वजन्मात म्हणा विषयांच्या आहारी जाऊन माझ्याकडून यातली कोणतीही गोष्ट घडली नाही. माझ्या कानांवरून या गोष्टी जायला हव्या होत्या त्या गोष्टी न गेल्यामुळे माझ्या कानांचा काहीच उपयोग राहीला नाही.
नाही संतकीर्ति श्रवणी आली । नाही साधूसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनी त्यागिली ॥२॥
मला जेव्हा कधी कोणी संतांची महती सांगायचा प्रयत्न केला त्याची मी टिंगल टवाळी केली. संत वचन सन्मार्गाला घेऊन जातात हे मी विसरलो. माझ्याकडून कधीच साधू संतांची सेवा घडली नाही. साधूसंतांच्या सेवेने पुण्य प्राप्त होते याचाही मला विसर पडला होता. मी माझ्या आयुष्यात माझ्या जन्मदात्याच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष केले. विषयांच्या आहारी जाऊन मी तीर्थक्षेत्री कधीही गेलो नाही. इतकेच नव्हे तीर्थक्षेत्री न जाताही व्रतांचे आचरण करुन पुण्यप्राप्ती होते तीही कधी मी करायचा प्रयत्न केला नाही.
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा जालो नरदेही येता । एका जनार्दनी स्मरे न आता ॥३॥
सर्व तीर्थांचे फळ ज्या पायात मिळते त्या मातेचाही मी कधी आदर केला नाही. तिने मला हाक मारता मी कधीच तिच्या हाकेला उत्तर दिले नाही असा मी करंटा आहे. अन मी केलेल्या या महाभयंकर पापांमुळेच या नरदेहात येत असतानाच मी बहिरा झालो आहे. या बहिरेपणावर मात करण्याचा एकमेव मार्ग मला समजला आहे, हरिभजनात रममाण होऊन मी माझा उद्धार करुन घेईन आणि यासाठी मला सद्गुरु मार्ग दाखवतील.
लेखक, संकलक: डॉ नरेंद्र भिकाजी कदम