TRENDING:

Vidhan Sabha Election Blog: कुणाच्या जागेवर कुणाचा डोळा, महायुती लढण्याआधीच जुंपणार?

Last Updated:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता जागावाटपाचा फॉर्म्युला ते कोणती जागा कोणाला मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता जागावाटपाचा फॉर्म्युला ते कोणती जागा कोणाला मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूला ३ - ३ प्रमुख पक्ष आहेत. मात्र यामध्ये जागावाटपाची सगळ्याच मोठी अडचण ही महायुतीत होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप आणि शिवसेनेसोबत नव्यानं आलेल्या अजित दादांमुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक होणार हे मात्र नक्की.

advertisement

महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला सुरूवात होताच राज्यातील अनेक मतदार संघात इच्छुकांनी आपापल्या पक्षनेत्याकडे जोरदार लॅाबिंग करायला सुरूवात केली आहे. यातच  काही जागांवर शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारानी तयारी सुरु केलीये. तर नव्यानं दाखल झालेल्या अजितदादा गटाचीही दावेदारी अनेक मतदारसंघावर असल्याच कळतंय. यात इथला प्रत्येक जण फक्त  तयारीतच नाही तर दोन्ही पक्षाचे नेते आणि इच्छुक उमेदवार आतापासून मतदार संघावर आपला दावा असल्याचे सांगू लागलेत.  राज्यातील असे कोणते विधानसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेना आणि भाजपमध्ये आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात उमेदवारीवरून बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

advertisement

सावंतवाडी विधानसभा मतदार संघ

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या मतदार संघांचे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत. मात्र आता त्यांच्या या मतदारसंघावर भाजपने देखील डोळा ठेवलाय. त्यांच्या विरोधात भाजपच्या राजन तेली यांनी तयारी सुरू केली असून, तळकोकणात भावी आमदार म्हणून देखील त्यांचे बॅनर लावण्यात आले होते. एवढंच नाही तर ते सातत्याने दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ते लागले असून, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ते मतदार संघात काम करताना पहायला मिळत आहेत.

advertisement

दापोली मतदार संघ

माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम या मतदार संघांचे विद्यमान आमदार आहेत. मात्र त्यांच्याच विरोधात भाजपच्या केदार साठे यांनी तयारी सुरू केली आहे. केदार साठे यांना मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रामदाम कदम हे भाजप आणि विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराज असून, नुकतीच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती.

advertisement

अंधेरी पूर्व

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश मुरजी पटेल यांना वरिष्ठ नेत्यांकडून मिळाल्यानंतर मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरादार तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात बैठका, विविध कार्यक्रम घेत ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. नुकताच अंधेरी इथं लाडकी बहीण योजनेचा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांनी घेतला होता. मात्र याच मतदारसंघात आता एंट्री केली आहे ती शिवसेनेमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या स्वीकृती शर्मा यांनी. स्वीकृती शर्मा या प्रदीप शर्मा यांच्या पत्नी असून त्यांनी देखील मतदारसंघात फिरायला सुरुवात केली आहे. नुकताच रक्षाबंधानाचा कार्यक्रम त्यांनी घेत मोठे शक्तीप्रदर्शन केलं होतं.

जोगेश्वरी पूर्व

2009 पासून या मतदार संघांचे नेतृत्व शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेले रवींद्र वायकर करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला असून आता या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी उमेदवार असतील असे बोललं जात आहे. तशी तयारी देखील मनीषा वायकर यांनी सुरू केली आहे. मात्र याच मतदारसंघातून भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक आणि पंकज यादव या दोन इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. या आधी उज्वला मोडक यांनी रवींद्र वायकर यांना विधानसभा निवडणुकीत आव्हान दिले होते.

मागाठाणे

प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र याच मतदार संघातून भाजपने देखील चाचपणी सुरू केली आहे. मागाठाणे विधानसभा मतदार संघांचे नेतृत्व केलेले विधानपरिषदचे आमदार प्रवीण दरेकर देखील या मतदार संघातून इच्छुक आहेत.  त्यांनी मतदार संघात तशी तयारी देखील सुरू केली आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा मतदारापर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

चेंबूर विधानसभा

या मतदारसंघाचे आमदार ठाकरे गटाचे प्रकाश फातर्फेकर असून महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेने या मतदार संघावर दावा केलेला आहे. तर दुसरीकडे भाजप देखील या मतदार संघासाठी आग्रही आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि तुकाराम काते इच्छुक असून भाजपकडून प्रसाद लाड देखील तयारीला लागलेत.

पालघर विधानसभा मतदार संघ

पालघर विधानसभा मतदारसंघांचे आमदार शिंदेच्या शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आहेत. मात्र भाजपने आतापासून या मतदार संघावर दावा करायला सुरुवात केली आहे. लोकसभेचं तिकीट कापण्यात आलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना पक्षाने या मतदार संघातून तयारी करायला सांगितल्याची माहिती असून राजेंद्र गावित यांनी तयारी देखील सुरू केली आहे. खासदार राहिलेले राजेंद्र गावित सध्या पालघर विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून बसले आहे.

मुरबाड विधानसभा मतदार संघ

मुरबाड मतदारसंघातून भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी 3 वेळा विजय प्राप्त केला आहे. विजयाची हॅट्ट्रिक केलेले किसन कथोरे यांच्या मुरबाड मतदार संघातच आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे सेनेनं सुरू केला आहे.  शिंदे सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे हे या मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे. मुरबाड मतदारसंघात शिंदे सेनेची ताकद देखील मोठी असल्याने हा मतदारसंघ शिंदेसेनेला सोडावा, अशी मागणी म्हात्रे यांनी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे

कल्याण पूर्व

कल्याण पूर्वच्या जागेवर भाजपचे गणपत गायकवाड हे निवडून आले आहेत. पण शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी पोलीस स्थानकात गोळीबार केला होता. त्यानंतर ते सध्या तुरुंगात आहेत. कल्याण पूर्वची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिंदे गटाकडूनही प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. काही महिन्यापूर्वी 'नवीन पर्व की जुनाच कल्याण पूर्व' असे बॅनर लावण्यात आले होते.

कोल्हापूर - कागल 

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे समरजीत घाटगे बंडखोरीच्या तयारीत असून आज आपली भूमिका जाहीर केली आहे. मुश्रिफांच्या विरोधात घाटगे हे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील आहेत. मात्र गेल्या वेळी २ नंबरवर असणारे भाजपते शिवाजी पाटील यांनी यावेळीही आपली जोरदार तयारी सुरूच ठेवली आहे. मागच्या वेळी २ उमेदवारांनी मत खाल्ल्यानं शिवाजी पाटलांचा पराभव झाला होता हे जगजाहीर आहे. यावेळी संधी न मिळाल्यास शिवाजी पाटील भाजपला जय महाराष्ट्र करत वेगळा विचार करू शकतात. पर्याय म्हणून अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटाला आयता उमेदवार भेटू शकतो.

राधानगरी

शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळ इथून अजित पवार गटात असणारे  के पी पाटील हे MVA च्या वाटेवर असल्याच कळतंय. शरद पवारांसोबतची वाढती जवळीक आणि भेटीगाठी पाहता अजित पवार गटाकडून तिकीट न मिळाल्यास MVA मधून त्यांची उमेदवारी पक्कीच मानली जातेय. यामुळेच या दोघांपैकी एकाला संधी मिळाल्यास महाविकास आघाडीला आयता उमेदवार मिळणार आहे.

परभणी 

गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे आमदार आहेत, गुट्टे भाजपचे नसले तरी मित्रपक्ष म्हणून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय, पण इथ भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकूटे यांची जोरदार तयारी सुरू आहे. दोघांपैकी एकाला बसवण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे.

नांदेड 

मुखेडमध्ये डॉ. तुषार राठोड हे भाजपचे आमदार आहेत मात्र इथून मुख्यमंत्र्यांचे पी एस बालाजी खतगावकर यांची तगडी दावेदारी मानली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी आग्रही असल्याचही बोलल जात असून काही दिवसांपूर्वी शंभुराज देसाई यांनी खतगावकरांच्या संपर्क कार्यालयाच उद्धाटन केलं होतं. तर नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर आमदार आहेत, शिवसेना शिंदेसोबत गेल्यानंतर इथून इथ भाजपचे जिल्हाध्यक्ष मिलींद देशमुख यांचीही चांगली तयारी झाली. तसंच भोकरमध्ये श्रीजया चव्हाण यांची तयारी झाली आहे. पण इथं अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार हे दंड थोपटू शकतात. यातच लोकसा पराभवानंतर नांदेडमध्ये महायुती बॅकफुटवर असल्याचं बोललं जातंय. तर नायगाव  इथ भाजपचे राजेश पवार आमदार आहेत मात्र इथं मीनल खतगावकर यांची भूमिका काय असणार याकडेही सगळ्यांच लक्ष लागलंय. मीनल खतगावकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानं त्यांनीही आपली तयारी थांबली नसल्याच स्पष्ट केलंय.

लातूर 

अहमदपूरमध्ये NCP बाबासाहेब पाटील आमदार आहेत पण भाजपचे जुनेजाणते असे दिलीपराव देशमुख यांचीही तयारी सुरू आहे. जर बाबासाहेब पाटील हेच महायुतीचे उमेदवार राहतील तर देशमुख वेगळा विचार करण्याची दाट शक्यता आहे. उदगीरमध्ये कॅबिनेट मंत्री संजय बनसोड यांच्या विरोधात सुधाकर भालेराव यांनी आधीच भाजपला रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केला.

नाशिकमध्येही गणित सोप्प नाही

नाशिक मध्यमध्ये देवयानी फरांदे भाजपच्या आमदार आहेत तिथे शिंदे सेनेचे अजय बोरस्ते यांच आव्हान त्यांना आहे. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांच्या विरोधीत शिंदे सेनेचे धनराज महालेही संपूर्ण तयारीत आहेत. नांदगावमध्ये शिंदे सेनेचे सुहास कांदे आमदार आहेत मात्र इथं भुजबळ परिवारांचे आणि त्यांच्यातल टशन ही लपून राहणार नाही. त्यामुळ इथ दोघांनाही आवरण ही मोठी कसरत असणारय

पुणे

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदार संघातही अजित पवार गटाचे दिपक मानकर यांची तगडी उमेदवारी मानली जात आहे. यातच आता भाजपचे नगरसेवकर अमोल बालवडकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट चंद्रकांत पाटलांच्याच विरोधात आपली दावेदारी केली.

इंदापुरात भाजपचे हर्षवर्धन पाटील विरूद्ध अजित पवार गटाचे आमदार दत्तामामा भरणे यांच्यातला विस्तव कसा विझवायचा हाही मोठा प्रश्न आहे. शांत झोप लागावी म्हणून भाजपात सामील झालेले हर्षवर्धन पाटील आता मोठ्या पवारांशीच जवळीक साधून भाजपचीच झोप उडवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

सोलापूर मध्यमधून भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अस सगळेच तगडे उमेदवार आहेत. सातारामधून वाईत अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या जागी भाजपचे मदन भोसले यांची प्रबळ दावेदारी आहे.

फलटणमध्येही वादाची चिन्ह  

रत्नागिरी लोकसभेच्या वेळी महायुतीतील मित्रपक्षांनी मनापासून प्रचार केला नसल्याच्या तक्रारी भाजपनं केल्या होत्या. त्याचाच परिणाम आता विधानसभेच्या निवडणूकांवर दिसेल. रत्नागिरी - चिपळून - दापोली इथ उमेदवार ठरवताना शिंदे - भाजपमध्ये वाद होणार आहेत.  यातच ८-१० मतदारसंघातील लोकसभेच्या पराभवाचे हिशोब विधानसभेला काढले जातील.

महायुतीला उमेदवारीला सर्वात कमी त्रास होणारी एकमेव जागा म्हणजे विदर्भ असणार आहे. रामटेकसारखे २-३ अपवाद सोडले तर इथं भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असतील.

मराठी बातम्या/Blog/
Vidhan Sabha Election Blog: कुणाच्या जागेवर कुणाचा डोळा, महायुती लढण्याआधीच जुंपणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल