आयएएस अधिकारी अविनाश कुमार बिहारच्या फारबिसगंजमधल्या बघुआ गावातले रहिवासी आहेत. त्यांची आई गृहिणी, तर वडील शिक्षक होते. अविनाश यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण फारबिसगंज इथल्या सरस्वती विद्या मंदिरमधून पूर्ण केलंय. त्यानंतर बोकारो इथून त्यांनी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. दहावीमध्ये त्यांना 10 सीजीपीए म्हणजेच 95 टक्के व बारावीमध्ये 93 टक्के इतके गुण मिळाले होते. अविनाश यांचे वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत.
advertisement
अविनाश कुमार यांनी कोलकाताच्या जादवपूर विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. तिथे 9.6 सीजीपीए मिळवून त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्येच एका विद्युत प्रकल्पामध्ये त्यांनी 11 महिने काम केलं.
त्यादरम्यान ते यूपीएससीकडे वळले. आयएएस होण्याचं स्वप्न बाळगून त्यांनी नोकरीतून राजीनामा दिला व दिल्लीत आले. चांगली नोकरी सोडून दिल्लीत येऊन अभ्यास करण्याचा निर्णय सोपा निश्चित नव्हता; पण त्यांनी त्यांचं स्वप्न सोडलं नाही.
यूपीएससीची परीक्षा खूप कठीण असते. अविनाश यांना पहिल्या 2 प्रयत्नांमध्ये पूर्वपरीक्षेतही उत्तीर्ण होता आलं नाही; पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. रोज ठरवून काही तास अभ्यास ते करायचे. पूर्णपणे यूपीएससीच्या अभ्यासातच ते गढून गेले होते. शेवटी 2022च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेत, मुख्य परीक्षेत व मुलाखतीत ते उत्तीर्ण झाले व त्यांना 17वी रँक मिळाली.
अविनाश यांनी यूपीएससीची परीक्षा पंचविसाव्या वर्षीच उत्तीर्ण केली आहे, तेही टॉपर रँकिंग मिळवून. हे यश कसं मिळालं याबाबत त्यांनी मीडियाला माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी कोचिंगचा आधार घेतला. नंतर फक्त स्वअभ्यासावरच त्यांनी भर दिला. यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी विभागवार व गांभीर्यानं अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला. स्वयंअध्ययनाशिवाय यूपीएससीमध्ये यश मिळवणं शक्य नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.