बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी मराठी नाटकाचे पहिल्यांदाच कौतुक केलेले नाही. यापूर्वी सुद्धा नाटकांचे कौतुक त्यांनी केले आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात चर्चेत राहिलेल्या 'संगीत देवबाभळी' नाटकाचे सुद्धा त्यांनी कौतुक केले होते. सांगितिक मैफल प्रेक्षकांना घडवणाऱ्या या नाटकातल्या कलाकारांचे आणि कथानकाचेही त्यांनी कौतुक केले होते. आता त्यानंतर पुन्हा एकदा एका मराठी नाटकाचे परेश रावल यांनी कौतुक केले.
advertisement
मराठी फिल्म ट्रेड या एक्स अकाऊंटवर परेश रावल यांची व्हिडिओ शेअर करण्यात आली आहे. परेश रावल म्हणतात, "नमस्कार, मराठी रंगभूमीवर ‘आमने सामने’ नावाचे एक सुंदर मराठी नाटक आहे. खरंतर हे नाटक सुंदर नाही तर, अतिसुंदर आणि अप्रतिम असं हे नाटक आहे. एक मजेदार आणि छोटी गोष्ट ज्या पद्धतीने दिग्दर्शकांनी मांडली आहे, लिहिली आहे खूपच छान आहे. दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी नाटकातले सर्व कंगोरे खूप उत्तम पद्धतीने हाताळले आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विनोद करण्याचा प्रयत्न लेखकांना खूप उत्तम पद्धतीने जमला आहे. अनेक गोष्टी प्रेक्षकांना विचार करायला लावणारं हे नाटक आहे."
"एका वेळी आपण हसतो, तर दुसऱ्या वेळी आपल्याला खरंच हसायचं होतं की या गोष्टीवर विचार करायचा होता, असं प्रश्न तुमच्या डोक्यात येईल. धम्माल विनोदी नाटक तुम्ही एकदा तरी आवर्जुन पाहायला हवं. हसता- हसता विचार करायला लावणारं आणि विचार करता- करता हसायला लावणारं हे नाटक आहे. मंगेश कदम निर्मित आणि अभिनित, दोन तरूण कलाकार, नीरज शिरवईकर दिग्दर्शित आणि लिखित ‘आमने सामने’ नाटक खूप सुंदर आहे. मजेदार आणि गोड नाटक पाहताना तुम्ही नक्कीच हसता हसता थकून जाल, याची मला शाश्वती आहे. प्रत्येक कलाकाराने खूप उत्तम पद्धतीने या नाटकामध्ये काम केले आहे."
"मला अभिनेता म्हणून हे नाटक फार आवडलंय. खरंतर मी दुसऱ्यांचा अभिनय फार कमी पाहतो. पण मला या नाटकामध्ये अभिनेत्री लीना भागवत यांचा अभिनय प्रचंड आवडला आहे. त्यांनी केलेले सादरीकरण, त्यांचा अभिनय आणि त्यांनी साकारलेला रोल अगदी वेगळ्याच उंचीवर हे नाटक घेऊन जाते. त्यांचा अभिनय पाहून मला त्यांना सांष्टांग दंडवत घालायची इच्छा झाली होती. त्यांचा अभिनय खरोखर खूप जबरदस्त आहे. मी सर्व प्रेक्षकांना असं आवाहन करतो की, एकदा तरी नक्कीच तुम्ही हे नाटक आवश्य पाहावं असं आहे. " अशी प्रतिक्रिया परेश रावल यांची आहे.
विनोदी अंगानेसुद्धा अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात हे दाखवून देणाऱ्या ‘आमने सामने’ नाटकातून लग्न संस्थेवर मार्मिकरित्या भाष्य करण्यात आले. मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने सजलेल्या या दोन अंकी नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार रंजकरित्या मांडलाय. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश आणि अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती ‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे.
