काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घरावर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरलेली असतानाच, आता रोहित शेट्टींचा लाडका 'सिम्बा' म्हणजेच रणवीर सिंगला लक्ष्य करण्यात आलं आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या या व्हॉईस नोटमध्ये रणवीरला अत्यंत अर्वाच्य भाषेत धमकावण्यात आलं असून, मोठी रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आली आहे.
advertisement
मुंबई पोलिस ॲक्शन मोडमध्ये
धमकी मिळताच रणवीर सिंगच्या टीमने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मुंबई पोलीस गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला आहे. रणवीर सिंगच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, तो व्हॉट्सॲप नंबर नक्की कोणाचा आहे आणि तो कुठून ऑपरेट केला जातोय, याचा शोध तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने घेतला जात आहे.
'धुरंधर'च्या यशानंतर दहशतीचं सावट?
रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा सिनेमा २०२५-२६ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटामुळे रणवीरची लोकप्रियता आणि त्याचं मार्केट व्हॅल्यू प्रचंड वाढलं आहे. याच प्रसिद्धीमुळे त्याला अशा गुन्हेगारी टोळ्यांकडून लक्ष्य केलं जातंय का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याआधीही बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सना अशा खंडणीसाठी धमक्या आल्या आहेत, पण रोहित शेट्टींच्या घरातील घटनेशी याचं कनेक्शन आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
