'रामायण' चित्रपटामध्ये टॉलिवूड अभिनेता विजय सेतुपथीची एन्ट्री होणार असल्याचे काही मिडिया रिपोर्टसमध्ये म्हटले आहे. विजय चित्रपटामध्ये रावणाचा भाऊ 'बिभीषण'ची अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या एन्ट्रीमुळे विजयच्या फॅन्समध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह टॉलिवूडमध्यही विजयची फार मोठी फॅन लिस्ट आहे. आता अशातच राघव जुयालच्या एन्ट्रीचीही सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. व्हरायटी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, राघव जुयाल "रामायण" मध्ये रावणाचा मोठा मुलगा मेघनाद (इंद्रजीत) याची भूमिका साकारताना दिसणार आहे. विक्रांत मेस्सी सुरुवातीला ही भूमिका साकारणार होता, परंतु काही कारणास्तव ते शक्य न झाल्यामुळे अभिनेत्याने प्रोजेक्टमधून एक्झिट घेतली.
advertisement
त्यानंतर लगेचच निर्मात्यांनी राघवशी संपर्क साधला आणि त्याने लगेचच चित्रपटात काम करण्यास होकार दिला. तो लवकरच चित्रीकरण सुरू करणार आहे. चित्रपटात राघव जुयालला कास्ट करण्यात आले असले तरी, चाहत्यांना त्याला चित्रपटात पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. खरं तर, त्याची भूमिका चित्रपटाच्या दुसऱ्या भागात असेल असे वृत्त आहे. तो पहिल्या भागात दिसणार नाही. 'रामायण' 2026 या वर्षातील दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. दुसरा भाग 2027 च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे, या मोठ्या चित्रपटात राघवला पाहण्यासाठी चाहत्यांना 2027 पर्यंत वाट पहावी लागेल. चार हजार कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाची शुटिंग गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. चाहते या बिग बजेट आणि मोस्ट अवेटेड चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.
रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे, काजल अग्रवाल, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय आणि कुणाल कपूर सारखे अनेक मोठे कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत. चित्रपटातील स्टारकास्ट बजेट इतकीच मोठी आहे. इतक्या दिग्गज कलाकारांना रूपेरी पडद्यावर एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानीच ठरणार आहे. 'रामायण' हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अत्यंत भव्य स्वरूपात सुरू असून, व्हीएफएक्स (VFX) आणि सेट डिझाइनवर मोठा खर्च केला जात आहे. सिनेमाचं एकूण बजेट चार हजार कोटींपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. सिनेमा 2 पार्ट्समध्ये रिलीज होणार आहे. पहिला पार्ट यावर्षी तर दुसरा पार्ट पुढील वर्षी येणार आहे.
बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे, भारतातील कोणत्याही चित्रपटाने निर्मितीसाठी इतका पैसा खर्च केलेला नाही. चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिलीज झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर कशा पद्धतीने कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
