बांगलादेश
बांगलादेशात रविवारी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हिंसक निदर्शनं झाली. त्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणि चकमकीत किमान 91 नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले. देशात अराजकता माजली आहे. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून देशातल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. जनतेच्या विरोधामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन देश सोडून पळून जावं लागलं आहे. तिथे सध्या मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे बांगलादेशातली परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लोक रस्त्यावर उतरून सरकारी मालमत्तांना आग लावत आहेत.
advertisement
शेख हसीना अनेक वर्षं सत्तेत होत्या. पंतप्रधान होण्याची ही त्यांची चौथीवेळ होती. गेल्या महिन्यापासून देशातल्या विद्यार्थ्यांनी नोकरीतल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. बांगलादेशातल्या सध्याच्या आरक्षण व्यवस्थेनुसार, 56 टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित आहेत. त्यापैकी 30 टक्के 1971च्या मुक्तिसंग्रामातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांसाठी, 10 टक्के मागास जिल्ह्यांसाठी, 10 टक्के महिलांसाठी, 5 टक्के अल्पसंख्याक जातींसाठी आणि एक टक्का अपंगांसाठी राखीव आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना दिलेल्या आरक्षणाला विद्यार्थ्यांचा विरोध आहे.
अफगाणिस्तान
2021मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा संपूर्ण ताबा घेतल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनाही देश सोडून पळून जावं लागलं होतं. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेतला होता. संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटलं होतं, की मानवतावादाचा विचार करून देशाने राष्ट्राध्यक्ष घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय दिला आहे.
वाचा - बांगलादेश का होरपळलं? एकाच दिवसात 100 जणांचा मृत्यू INSIDE STORY
या नेत्यांनी सोडला देश
भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी देश सोडला. 1999 मध्ये निवडून आलेले नवाझ शरीफ सरकार पाडल्यानंतर मुशर्रफ यांनी स्वतःला पाकिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले होते. त्यानंतर ते ऑगस्ट 2008 पर्यंत या पदावर होते.