TRENDING:

Diwali 2024: दिवाळीच्या दिवशीच शीख समाज का साजरी करतो 'बंदी छोड दिवस'?

Last Updated:

या दिवशी शीख लोक बंदी छोड दिवस साजरा करतात. बंदी छोड दिवस किंवा बंदी छोड दिनारा आणि दिवाळी हे वेगवेगळे सण आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दिवाळी हा भारतातला प्रमुख सण आहे. भारतात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. त्यांपैकी एक म्हणजे शीख धर्म. या धर्मातलेही अनेक जण दिवाळी साजरी करतात; मात्र दिवाळीच्याच दिवसात शीख धर्मीयांचा एक प्रमुख दिवस साजरा केला जातो. त्याचं त्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो दिवस म्हणजे बंदी छोड दिवस. हा दिवस, दिवाळी आणि मुघलांचं राज्य यांचं काय नातं आहे.
News18
News18
advertisement

भारतात शीख धर्माचे अनेक अनुयायी आहेत. संपूर्ण भारतभरात विविध भागांत शीख धर्मीय नागरिक राहतात. या धर्मात दिवाळी साजरी केली जाते; मात्र त्यामागचं कारण हिंदूंच्या कारणासारखं नसतं. श्रीराम रावणावर विजय मिळवून वनवासातून परत आले. त्यामुळे हिंदू धर्मात दिवाळीमध्ये दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. शीखांमध्येही त्या अमावास्येच्या दिवशी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. त्यामागचं कारण वेगळं आहे.

advertisement

या दिवशी शीख लोक बंदी छोड दिवस साजरा करतात. बंदी छोड दिवस किंवा बंदी छोड दिनारा आणि दिवाळी हे वेगवेगळे सण आहेत. बंदी छोड दिवस गुरू हरगोविंदसाहिब ग्वाल्हेर किल्ल्यातल्या बंदिवासातून मुक्त होण्याबद्दल साजरा केला जातो.

गुरू हरगोविंदसाहिब यांनी अमृतसरमध्ये श्री अकाल तख्त साहेबची निर्मिती केली आणि ते त्यांच्या सेनेची ताकद वाढवण्याचं काम करत होते. त्या वेळी लाहोरचे तत्कालीन नवाब मुर्तजा खान यांनी मुघल राजा जहांगीर याला त्याचं चुकीचं कारण सांगितलं. वडिलांचा अपमान आणि त्यांच्या हत्येचा सूड घेण्याची ते तयारी करत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे जहांगीरनं वजीर खान आणि गुंचा बेग यांना गुरू हरगोविंद यांना अटक करण्यास सांगितलं. ते अमृतसरला गेले. वजीर खान गुरू हरगोविंदजी यांना खूप मानत होता. त्यामुळे त्यानं अटक करण्याऐवजी दिल्लीला सोबत येण्याची विनंती केली. ते मान्य करून जहांगीरला भेटायला ते दिल्लीत गेले.

advertisement

दिल्लीत गेल्यावर जहांगीर आणि गुरू हरगोविंदसाहिब यांच्यात मैत्री झाली. हिंदू आणि मुसलमान यात सर्वांत चांगला धर्म कोणता असं त्याला विचारलं असता, गुरू हरगोविंदजी यांनी जहांगीरला काही ओळी ऐकवल्या. त्यामुळे तो प्रभावित झाला. गुरू हरगोविंदजी यांच्या शिकारीच्या कौशल्याबद्दल ऐकून जहांगीरनं त्यांना स्वतःसोबत एकदा शिकारीला नेलं. तिथे एका चवताळलेल्या वाघानं त्याच्यावर हल्ला केला. तेव्हा गुरू हरगोविंदजी यांनी तलवारीच्या एका फटक्यात वाघाला ठार केलं आणि जहांगीरचे प्राण वाचवले.

advertisement

जहांगीरच्या दरबारात एक श्रीमंत सावकार होता. त्याला गुरू अर्जनदेवजी यांच्या काळात त्यांचा मुलगा तरुण हरगोविंदजी याच्याशी स्वतःच्या मुलीचं लग्न लावून द्यायचं होतं; मात्र चंदू शाहबद्दल वाईट कानावर आल्यामुळे गुरू अर्जनदेव यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे चंदू शाह संतापलेला होता. गुरू हरगोविंदजी आणि जहांगीरची मैत्री झाल्यामुळे चंदू शाहला राग येत होता. त्यादरम्यान जहांगीरची प्रकृती बिघडली. त्याचा फायदा घेऊन चंदू शाहनं जहांगीरला ज्योतिषांकरवी संदेश पाठवला. ग्वाल्हेरच्या किल्ल्यात काही धर्मगुरूंनी त्याच्यासाठी प्रार्थना केली तर त्याची तब्येत ठिक होऊ शकते असं त्यानं सांगितलं. गुरू हरगोविंद यांच्यावर त्यानं विशेष भर दिला. जहांगीरनं आग्रह केल्यामुळे गुरू हरगोविंदजी त्यांच्या समर्थकांसह ग्वाल्हेरला गेले.

advertisement

तिथे गेल्यावर गुरू हरगोविंदजी यांना अनेक राजे बंदिवासात आढळले. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. किल्ल्याचे गव्हर्नर हरी दास यांच्या साह्यानं गुरू हरगोविंदजी यांनी त्या राजांची परिस्थिती सुधारली. हरि दास गुरू हरगोविंदजी यांचे शिष्य बनले होते; पण ती गोष्ट चंदू शाहला माहीत नव्हती. चंदू शाहनं गुरू हरगोविंदजी यांना अटक करण्याबाबत हरि दास यांना पत्र लिहिलं; मात्र ते पत्र हरि दास यांनी गुरू हरगोविंद यांना दाखवलं.

इकडे आग्र्यामध्ये जहांगीरची तब्येत हळूहळू सुधारत होती. त्याच वेळी प्रसिद्ध सूफी संत साई मियाँ मीर हे जहांगीरच्या दरबारात गेले. ते गुरू हरगोविंद आणि त्यांच्या वडिलांचे सुहृद होते. त्यांनी जहांगीरला गुरू हरगोविंद यांना मुक्त करण्यास सांगितलं. जहांगीरनंही त्याला मान्यता दिली. वजीर खानला ग्वाल्हेरला जाऊन गुरू हरगोविंद यांना मुक्त करण्यास सांगितलं; मात्र गुरt हरगोविंदजी यांनी त्यास नकार दिला. आपल्यासोबत 52 राजांनाही मुक्त करावं अशी अट त्यांनी घातली.

वजीर खाननं जहांगीरच्या कानावर घडलेला वृत्तांत घातला. जहांगीर या गोष्टीला राजी होईना; मात्र नंतर त्यानंही एका अटीवर ते मान्य केलं. जो राजा गुरू हरगोविंद यांच्या कपड्याचा मागचा भाग पकडू शकेल, त्याच राजाला मुक्त केलं जाईल, असं जहांगीरनं सांगितलं. यावर गुरू हरगोविंद यांनी एक असा कपडा तयार केला की त्याला 52 पट्ट्या होत्या. त्यामुळे प्रत्येक राजासाठी एक एक पट्टी उपलब्ध होती. त्या पट्टीला पकडून ते तुरुंगातून बाहेर आले.

ग्वाल्हेरमधून निघून गुरू हरगोविंदजी अमृतसरला गेले. त्या वेळी सगळ्या लोकांनी दिवे, मेणबत्त्या, पणत्या लावून रोषणाई केली. ज्या दिवशी गुरू हरगोविंदजी परत आले, त्या दिवशी अमावास्या होती. त्यामुळे त्या दिवशी गुरुद्वारा सुवर्ण मंदिर, अमृतसर इथं सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. शीख धर्मीयांचे गुरू त्या दिवशी परत आले म्हणून त्या दिवशी बंदी छोड दिवस साजरा केला जातो. ग्वाल्हेरमध्ये ज्या ठिकाणी त्यांना बंदिवासात ठेवण्यात आलं होतं, तिथे आता दाता बंदी छोड साहिब हा गुरुद्वारा आहे. तिथेही या दिवसानिमित्त भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

गुरु हरगोविंदसाहिब परत आल्याबद्दल या दिवशी लोक आनंद व्यक्त करतात. त्यामुळेच दिवे लावून, फटाके उडवून हा दिवस साजराही करतात. देशातच नाही, परदेशातही शीख धर्मीय हा दिवस साजरा करतात. हिंदू लोक तेव्हा दिवाळी साजरी करतात. दिव्यांची रोषणाई करून श्रीरामांच्या परत येण्याचा आनंद साजरा केला जातो. त्याच प्रकारचा पण थोडा वेगळा सण शीख धर्मीय बंदी छोड दिवस म्हणून साजरा करतात.

मराठी बातम्या/Explainer/
Diwali 2024: दिवाळीच्या दिवशीच शीख समाज का साजरी करतो 'बंदी छोड दिवस'?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल