हिजबुल्लाह म्हणजे काय?
हिजबुल्लाह ही एक शिया मुस्लिम संघटना आहे. ती राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहे आणि लेबनॉनमधल्या सर्वांत शक्तिशाली सैन्यावर या संघटनेचं नियंत्रण आहे. इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर आक्रमण केलं तेव्हा 1980च्या दशकाच्या सुरुवातीला हिजबुल्लाहची स्थापना झाली. त्या वेळी लेबनॉनदेखील गृहयुद्धाचा सामना करत होता. अधिकृत कागदपत्रांनुसार, हिजबुल्लाहची स्थापना 1985मध्ये झाली आहे. ही संघटना 1992पासून लेबनॉनमधल्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये भाग घेत आहे. 2000मध्ये जेव्हा इस्रायली सैन्याने लेबनॉनमधून माघार घेतली तेव्हा त्यांना देशाबाहेर काढण्याचं श्रेय हिजबुल्लाहने घेतलं होतं.
advertisement
हिजबुल्लाहचा नेता कोण आहे?
हिजबुल्लाहचं नेतृत्व 1992 पासून शेख हसन नसरल्लाह याच्याकडे आहे. शेख हसन हा एक शिया धर्मगुरू आहे. नसराल्लाह याला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा निकटवर्तीय मानलं जातं. 1981मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी नसरल्लाहची लेबनॉनमध्ये वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. हिजबुल्लाहला राजकीयदृष्ट्या मजबूत करण्याचं आणि संघटनेला लष्करीदृष्ट्या सामर्थ्यशाली करण्याचं श्रेय नसरल्लाहला दिलं जातं; मात्र नसराल्लाह गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिकपणे दिसला नाही. बहुतांश वेळा तो टीव्हीवर भाषणं देतो. इस्रायल आपल्या नेत्याला मारील, अशी भीती हिजबुल्लाहला आहे.
हिजबुल्लाहचं सामर्थ्य किती आहे?
इस्रायली सैन्याने 2000 मध्ये लेबनॉनमधून माघार घेतल्यानंतर, हिजबुल्लाहने दक्षिण लेबनॉनला आपला गड बनवलं. तिथे हजारो लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्रांचा साठा आहे. हिजबुल्लाह ही जगातल्या सशस्त्र बिगर-शासकीय सैन्यदलांपैकी एक आहे. संघटनेचा दावा आहे, की त्यांच्याकडे 1,00,000 सैनिक आहेत; पण अनेक डिफेन्स थिंक टँकचा अंदाज आहे, की हिजबुल्लाहच्या सैन्याची एकूण संख्या 20 हजार ते 50 हजारांदरम्यान असू शकते. हिजबुल्लाहच्या सैन्यात सीरियाच्या गृहयुद्धात लढलेले अनेक प्रशिक्षित आणि अनुभवी सैनिकही आहेत.
रणगाडे आणि क्षेपणास्त्रांची संख्या किती?
हिजबुल्लाहकडे 120,000 ते 200,000 रॉकेट आणि क्षेपणास्त्रं असल्याचा दावा अनेक डिफेन्स थिंक टँकनी केला आहे. यामध्ये लहान आणि पृष्ठभागावरून पृष्ठभागावर जाणाऱ्या रॉकेटची संख्या जास्त आहे. काही तज्ज्ञांचा असाही दावा आहे, की हिजबुल्लाहकडे गायडेड क्षेपणास्त्रंदेखील आहेत. ही क्षेपणास्त्रं इस्रायलवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. हिजबुल्लाहकडे असलेलं सैन्य आणि शस्त्रास्त्रांच्या संख्येमुळे ही संघटना हमासपेक्षा वेगळी ठरते. हिजबुल्लाह हमासपेक्षा मजबूत शक्ती असल्याचं मत अनेक संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
हिजबुल्लाहचा मुख्य अजेंडा काय आहे?
हिजबुल्लाहचा स्वतःचा जाहीरनामा देखील आहे. त्यामध्ये या संघटनेचा मुख्य अजेंडा सांगितला आहे. सशस्त्र संघर्षाद्वारे इस्रायलचा नायनाट करणं, अमेरिकेतल्या हुकूमशाहीविरुद्ध लढणं, भांडवलशाही शक्तींशी लढा देणं, अशा अजेंडाचा त्यात समावेश आहे. ढोबळपणे सांगायचं झालं तर हिजबुल्लाहची मुख्य लढाई इस्रायल आणि अमेरिकेशी आहे.
फंडिंग कुठून मिळतं?
हिजबुल्लाहला प्रामुख्याने इराणकडून पैसे आणि शस्त्रं मिळतात. याशिवाय इतर अनेक शियाबहुल देश आणि संघटना गुप्तपणे याला निधी आणि शस्त्रं पुरवतात. जगातल्या अनेक देशांनी या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. 1997मध्ये अमेरिकेने ही दहशतवादी संघटना घोषित केली आहे. इस्रायल, जर्मनी आणि अनेक पाश्चिमात्य देशही याला दहशतवादी संघटना मानतात. सौदी अरेबिया आणि अरब लीगनेही याला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे.
2006 मध्ये इस्रायलशी झालं होतं युद्ध
हिजबुल्लाह आणि इस्रायल समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2006मध्ये, हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यात युद्ध झालं होतं. त्या वेळी हिजबुल्लाहने इस्रायलच्या हद्दीत प्राणघातक हल्ला केला होता. त्या वेळी इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहला संपवण्यासाठी दक्षिण लेबनॉनवर हल्ला केला होता; पण ही संघटना टिकून राहिली. तेव्हापासून या संघटनेने इस्रायलवर अनेक हल्ले केले आहेत. हिजबुल्लाह आपल्या सैनिकांची संख्या वाढवत आहे आणि नवीन शस्त्रं मिळवत आहे.