माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये जेव्हा देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी इंदिरा गांधींविरोधात सगळ्यात मोठं वादळ बिहारमधूनच उठलं होतं. त्या वादळाचं नाव म्हणजे जय प्रकाश नारायण. जेपी यांनी इंदिरा गांधी विरोधात रान पेटवलं होतं. अनेक विद्यार्थी संघटना इंदिरा गांधी विरोधात एकवटल्या होत्या. जयप्रकाश नारायण यांनी उभारल्या लढ्यापुढे इंदिरा गांधी यांनाही हात टेकावे लागले. आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष संपूर्ण देशात बॅकफुटला गेला. इंदिरा गांधी यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर देशात जनता पार्टीचं सरकार आलं. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.
advertisement
आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी कमबॅक कसं केलं?
पण याच राज्यातून इंदिरा गांधीनं पुन्हा कमबॅक केलं. याला कारण ठरलं १९७७ साली बिहारमध्ये घडलेलं हत्यांकाड. इथं कुर्मी समुदायाच्या एका गटाने हरिजन समुदायावर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी अकरा लोकांना जिवंत जाळून मारलं होतं. यात एका १४ वर्षांच्या मुलाचा देखील समावेश होता. ज्यावेळी या लोकांना जाळून मारलं जात होतं. त्यावेळी १४ वर्षांचा राजाराम जीव वाचवण्यासाठी आगीतून बाहेर येत होता. पण हल्लेखोरांनी त्याला पकडून पुन्हा आगीत लोटलं. अत्यंत क्रूर पद्धतीने अकरा जणांना संपवलं होतं. हा सगळा प्रकार हरनौत विधानसभा मतदारसंघातील बेलछी गावात घडला होता.
सोनिया गांधींचा विरोध पण ऐकणार त्या इंदिरा कसल्या?
खरं तर, १९७७ च्या काळात हे गाव अत्यंत दुर्गम भागात होतं. दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या. रस्ते नव्हते. त्यामुळे जेव्हा हे हत्याकांड घडलं, तेव्हा याबाबत फारसा गाजावाजा झाला नाही. घटनेचं कुणाला गांभीर्य देखील नव्हतं. मात्र या घटनेची माहिती जेव्हा इंदिरा गांधींना समजली. त्यावेळी त्यांना जणू सत्तेत कमबॅक करण्याचा मार्गच सापडला होता. आणीबाणीमुळे इंदिरा गांधी विरोधात देशभरात संतापाची लाट होती. लोकांनी काँग्रेसला नाकारलं होतं. पण बेलछी घटनेमुळे आपल्याबद्दल पुन्हा सहानुभूती निर्माण होईल, याची कल्पना इंदिरा गांधींना आली. त्यांनी बेलछी गावाला भेट देण्याचं ठरवलं. बेलछीला जाण्याचा मानस जेव्हा इंदिरा गांधींनी आपल्या सून सोनिया गांधींना बोलून दाखवला. तेव्हा सोनिया गांधींचा याला विरोध केला. सुरक्षेच्या दृष्टीने इंदिरा गांधींनी तिथे जाऊ नये, असं सोनिया गांधींना वाटत होतं. मात्र ऐकतील त्या इंदिरा गांधी कसल्या? त्यांनी कसल्याही परिस्थितीत बेलछीला जाण्याचा निर्धार केला. याबाबतचा सगळा घटनाक्रम सोनिया गांधी यांची बायोग्राफी लिहिणारे लेखक जेवियर मारो यांनी 'द रेड साडी' या पुस्तकात लिहिला आहे.
मुसळधार पाऊस, कमरेपर्यंत पाणी आणि हत्तीवरून प्रवास
जेवियर मारो 'द रेड' साडी पुस्तकात लिहितात की, इंदिरा गांधींनी १३ ऑगस्ट १९७७ रोजी बेलछीला जायचं ठरवलं. त्यादिवशी बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. तरीही इंदिरा गांधी विमानाने पाटणा येथे पोहोचल्या. त्यानंतर त्या कारने बेलछी गावाकडे रवाना झाल्या. पण वाटेत चिखल आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यांना पुढे जाणं कठीण होतं. काही अंतर त्या कारने पुढे गेल्या. पण तिथली एकूण परिस्थिती पाहता, इंदिरा गांधींनी माघारी जावं, हा दौरा पुढे ढकलावा, असं कार्यकर्त्यांना वाटत होतं. मात्र इंदिरा गांधी मागे हटल्या नाहीत. त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांनी ट्रॅक्टरने बेलछीकडे जाण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना माहीत होतं की जर त्या पुढे गेल्या तर त्यांचे कार्यकर्ते आपोआप मागे येतील.
ट्रॅक्टरने काही अंतर गेल्यानंतर वाटेत एक नदी होती. नदीतून वेगाने पाणी वाहत होतं. अशा स्थितीत नदी पार करणं अशक्य वाटत होतं. पण यावेळी इंदिरा गांधींनी हत्तीवर बसून नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला. यासाठी मोती नावाच्या हत्तीची व्यवस्था करण्यात आली. हत्तीवर बसण्यासाठी हत्तीवर हौदा बांधला नव्हता. तशाच स्थितीत इंदिरा गांधी हत्तीवर बसण्यास तयार झाल्या. महावतानंतर इंदिरा गांधी हत्तीवर बसल्या. त्यांच्या मागे प्रतिभा सिंह पाटील याही बसल्या. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. त्या इंदिरा गांधींचा पदर घट्ट पकडून बसल्या. एकेठिकाणी तर कमरेपर्यंत पाणी आलं होतं. पण इंदिरा गांधी डगमगल्या नाहीत. त्या अंधारातून वाट काढत, नदी ओलांडत बेलछी गावात पोहोचल्या.
ज्यावेळी इंदिरा गांधी बेलछी गावात पोहोचल्या, तेव्हा सगळं गाव हुरळून गेलं. आपलं दु:ख जाणून घेण्यासाठी देवदूतच आला असावा, अशी गावकऱ्यांची भावना होती. गावकऱ्यांचं अश्रू पुसण्यासाठी माजी पंतप्रधान येतात, हीच गोष्ट गावकऱ्यांसाठी डोंगराएवढी होती. लोकांनी जेव्हा इंदिरा गांधींकडे पाहिलं, तेव्हा त्यांची साडी ओली होती. लोकांनी इंदिराजींना नवी साडी दिली. मिठाई दिली. आपण तुम्हाला मत न देऊन चूक केली, असंही गावकऱ्यांनी म्हटलं. इंदिरा गांधींनी देखील पीडितांना जवळ घेतलं, आपुलकीने चौकशी केली. त्यांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला. या घटनेनंतर जेव्हा इंदिरा गांधी दिल्लीला पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. कारण या घटनेचं महत्त्व इंदिरा गांधींना जणू आधीच समजलं होतं.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये एकच फोटो होता. तो म्हणजे इंदिरा गांधींचा हत्तीवर बसलेला. आणीबाणीमुळे लोकांच्या मनात जो राग होता. तो राग कमी करण्यात या घटनेचा मोठा वाटा असल्याचं मानलं. इथूनच इंदिरा गांधींविरोधातला रोष कमी व्हायला सुरुवात झाली.
त्यावेळी बेलछीमध्ये काय घडलं होतं?
राज्यसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष हरिवंश एका वृत्तपत्राचे संपादक असताना त्यांनी बेलछीला भेट दिली होती. त्यांनी या घटनेबद्दल सांगताना म्हटलं की, बेलछी गावात कुर्मी महावीर महातो आणि हरिजन सिंधवा यांच्यात वाद होता. सिंधवा यांनी नालंदा येथील त्यांचे वडिलोपार्जित घर सोडले होते आणि ते बेलछी इथे आपल्या सासऱ्यांच्या घरी राहू लागले. तेव्हा कुर्मी महावीर महातो हा गावातील एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता. त्याने अनेक गरीब हरिजनांच्या जमिनी बळकावल्या होत्या. त्याच्या गुंडगिरीचा सिंधवा यांनी विरोध केला. इथूनच दोन गटात वादाची ठिणगी पडली. सिंधवा यांनी महावीरला गावात येऊ देणार नाही. कोणाची पिके लुटू देणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली. यानंतर कुर्मींनी हरिजनांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
२७ मे १९७७ रोजी दोन्ही गटात तुंबळ मारामारी झाली. कुर्मी गटाने आधी बेलछीवर हल्ला केला. पण हरिजनांनी हा हल्ला परतून लावला होता. यानंतर महावीर महातोच्या घरातून आणखी एक टोळी बाहेर आली. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. दिवसभर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे युद्ध सुरू होते. पण महावीर गट सिंधवा गटावर भारी पडला. त्यांनी सिंधवा गटातील लोकांना बाहेर काढलं. सर्वांचे हात बांधून गावातून धिंड काढली. यानंतर गावातून बाहेर आणून ४०० लोकांसमोर या लोकांना गोळ्या घालून आगीत टाकलं. यात १४ वर्षांचा मुलगा राजारामने आगीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला पुन्हा उचलून आगीत टाकण्यात आले. मृतांमध्ये ८ दलित आणि ३ इतर मागासवर्गीय तरुणांचा समावेश होता. बेलछी हत्याकांडानंतर देशातील दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचारांचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला. पण इंदिरा गांधींच्या या भेटीमुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा जनतेचा पाठिंबा मिळण्यास मदत झाली.
