स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस म्हणजे 12 ऑगस्ट 1947 या दिवसाची सुरुवात महात्मा गांधी यांनी कोलकात्याच्या जवळ असलेल्या सोडेपूरमधल्या आश्रमातून केली. त्या आश्रमात महात्मा गांधी यांना भेटण्यासाठी सुहरावर्दी आले होते. ज्यांच्या माथी पाच हजार हिंदूंच्या हत्येचं पाप आहे, तेच ते सुहरावर्दी. हे पाप एखाद्या अभिमानास्पद गोष्टीप्रमाणे मिरवत सुहरावर्दी फिरायचे. प्रार्थना सभा झाल्यानंतर महात्मा गांधींनी सभेला संबोधित करताना सुहरावर्दी यांचं आश्रमात येण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
advertisement
त्यांनी सांगितलं, की 'काल रात्री सुहरावर्दी साहेब मला भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितलं, की अशा अशांत परिस्थितीत मी कोलकाता सोडून जाऊ नये. कोलकात्यामध्ये शांतता प्रस्थापित होईपर्यंत मी इथेच राहावं अशी विनंतीही त्यांनी मला केली आहे. त्यांची विनंती मान्य करण्याआधी मी सुहरावर्दी साहेबांपुढे एक अट ठेवली आहे,' असंही महात्मा गांधी म्हणाले.
ती अट अशी असेल, की कोलकात्यामधल्या एखाद्या तणावग्रस्त भागात सुहरावर्दी साहेब माझ्यासोबत एका छताखाली राहतील. त्या वेळी तिथे पोलीस किंवा लष्कराचे कोणतेही सैनिक नसावेत, असं महात्मा गांधी म्हणाले. पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये सीमा आयोग फाळणीची ठरवण्यात आलेली सीमा स्पष्ट करील. अशा कठीण काळात हिंदू-मुसलमानांनी आयोगाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.
प्रशांत पोळ यांनी ‘वे पंद्रह दिन’ या त्यांच्या पुस्तकात या दिवसाबद्दल लिहिलं आहे. महात्मा गांधी यांनी सभेला संबोधित करताना पुढे असं म्हटलं, की गोवा, दीव आणि पाँडिचेरीसारख्या पोर्तुगीज आणि फ्रेंचशासित राज्यांमध्ये राहणारे भारतीयही 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्याची घोषणा करणार आहेत; मात्र तसं करणं पूर्णपणे मूर्खपणाचं ठरेल. आपल्या भारतीयांना गर्व झाला आहे, असाच याचा अर्थ निघू शकतो. सध्या भारतातून ब्रिटिश जात आहेत, फ्रेंच किंवा पोर्तुगीज नाहीत. मला असं वाटतं, की पोर्तुगीज आणि फ्रेंचशासित राज्यांमध्ये राहणारे भारतीयही आज नाहीतर उद्या स्वतंत्र होतीलच; पण आत्ता त्यांनी कायदा मोडण्याची गरज नाही.
लाहोरमध्ये उसळल्या दंगली
सिरील रेडक्लिफ यांच्या सीमा आयोगानं लाहोरचा भारतात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी वार्ता लाहोरमध्ये आदल्या रात्री पसरली. लाहोर भारतात समाविष्ट होणार...ही बातमी आगीसारखी सगळ्या लाहोरमध्ये पसरली. यामुळे लाहोरमध्ये सुरू असलेल्या दंगलींनी रौद्ररूप धारण केलं. मुस्लिम नॅशनल गार्डच्या लोकांनी हिंदू आणि शीखबहुल भागांना लक्ष्य केलं. डिप्टीगंज नावाच्या हिंदू-शीखबहुल भागात सकाळी 11 वाजता दंगेखोरांनी भर रस्त्यात एका शीख वृद्धाची हत्या केली. दुपारी तीन वाजेपर्यंत दंगलींमध्ये मारल्या गेलेल्यांची अधिकृत आकडेवारी 50च्या पुढे गेली होती. मृतांमध्ये बहुतांश हिंदू व शीख होते. संध्याकाळपर्यंत लाहोरमधल्या दंगलींची आग गुरूदासपूर आणि लायलपूरपर्यंत पोहोचली.
काश्मीरबाबत काक यांचा डाव
महाराजा हरिसिंह यांच्याशी झालेल्या भेटीत लॉर्ड माउंटबॅटन यांनी काश्मीर पाकिस्तानात विलीन करण्याचा सल्ला त्यांना दिला होता, असं प्रशांत पोळ यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. महाराजा हरिसिंह यांनी मात्र तो सल्ला साफ धुडकावून लावला. महाराजांचा हा पवित्रा पाहून त्यांचे पंतप्रधान रामचंद्र काक यांनी नवा डाव खेळला. काश्मीर पाकिस्तानात विलीन झालं नाही तर ते कोणत्याही परिस्थितीत भारतातही विलीन होऊ नये, असं काक यांना वाटत होतं. त्यामुळे काक यांनी महाराजा हरिसिंह यांना काश्मीर स्वतंत्र ठेवण्याचा सल्ला दिला.
यामुळे काक यांनी काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी सरळ सरळ वैर पत्करलं. काही दिवसांनी श्रीनगरमध्ये गेलेल्या महात्मा गांधी यांनी काक यांना काढून टाकावं, असं महाराजा हरिसिंह यांना सांगितलं. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहावरून त्यांनी असं सांगितलं होतं. 12 ऑगस्ट 1947 रोजी महाराजा हरिसिंह यांनी काक यांना काढून त्यांच्या जागी जनकसिंह यांना जम्मू आणि काश्मीरचे पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं. तसंच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काक यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आलं.