दिल्लीत राहत असताना जिना यांनी जगन्नाथ आझाद यांनी लिहिलेल्या अनेक कविता वाचल्या होत्या. या कविता वाचून जिना आझादांच्या उर्दू भाषेवरच्या प्रभुत्वाने प्रभावित झाले होते. जगन्नाथ आझादांच्या कविता वाचून जिना यांना वाटलं होतं, की जेव्हा पाकिस्तानचं राष्ट्रगीत लिहिलं जाईल, तेव्हा ते जगन्नाथ आझादांना नक्कीच संधी देतील. 9 ऑगस्ट 1947 रोजी तो दिवस उजाडला होता. मोहम्मद अली जिना यांनी जगन्नाथ आझादांना बोलावण्याचा विचार केला; पण नंतर अचानक ते थांबले.
advertisement
(Independence Day : स्वातंत्र्यदिनासाठी 15 ऑगस्टच तारीख का निवडली? तुम्हाला माहितीय का कारण)
जगन्नाथ आझाद हे हिंदू आहेत, असा विचार जिनांच्या मनात आला. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून पाकिस्तानचं राष्ट्रगीत लिहून घेणं योग्य ठरेल का, अशी शंका त्यांच्या मनात होती; पण एखादी व्यक्ती उर्दूमध्ये चांगली कविता लिहू शकत असेल तर तिच्या धर्माचा विचार करण्यात अर्थ नाही, असांही एक विचार त्यांच्या डोक्यात आला. हाच विचार करून जिनांनी जगन्नाथ आझादांना भेटण्याचं निमंत्रण पाठवलं. जिनांचा फोन येताच आझाद नियोजित वेळेआधी जिनांच्या बंगल्यावर पोहोचले.
जिनांनी पहिल्यांदा जगन्नाथ आझादांवर नजर टाकताच त्यांच्या कपाळावर काही क्षणांसाठी आठ्या आल्या. कारण, त्यांच्या कल्पनेनुसार, उत्कृष्ट उर्दू कविता लिहू शकणारा कवी 50 वर्षांचा मध्यमवयीन माणूस असेल; पण जिनांच्या समोर जेमतेम 30 वर्षांचा तरुण उभा होता. सर्वसाधारण विचापूस करून जिनांनी मुद्द्याला हात घातला आणि पाकिस्तानचं राष्ट्रगीत होईल अशी रचना त्यांच्याकडे आहे का, असा प्रश्न विचारला. आझादांकडे त्या वेळी अशी कोणतीही कविता नव्हती; पण तात्काळ मनात आलेल्या काही ओळी त्यांनी जिनांना ऐकवल्या.
"ऐ सरजमीं-ए-पाक
जरें तेरे हैं आज
सितारों से ताबनाक,
रोशन है कहकशां से
कही आज तेरी खाक
तुन्दी-ए-हसदां पे
गालिब हैं तेरा सवाक,
दामन वो सिल गया है
जो था मुद्दतों से चाक
ऐ सरजमीं-ए-पाक!"
अशा त्या ओळी होत्या. या ओळी ऐकून जिनांच्या तोंडून फक्त कौतुक बाहेर आलं. जिनांना ही रचना इतकी आवडली की त्यांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत लिहिण्याची जबाबदारी एका पंजाबी हिंदूवर सोपवली. अशा प्रकारे 'वतन-ए-पाकिस्तान'चं राष्ट्रगीत एका हिंदूने लिहिलं.
मुख्यमंत्र्यांनी महात्मा गांधींकडून लिहून घेतलं राजीनामापत्र आणि मग…
प्रभात प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'ते पंधरा दिवस' या पुस्तकात महात्मा गांधी आणि मध्य प्रांताचे पहिले मुख्यमंत्री डॉ. नारायण भास्कर खरे यांच्याशी संबंधित एक प्रसंग नमूद करण्यात आला आहे. असं लिहिण्यात आलं आहे, की डॉ. खरे यांना महात्मा गांधींशी संबंधित अनेक गोष्टी आवडत नव्हत्या. गांधींचा मुस्लिम लीगकडे कल होता, या गोष्टीचाही त्यात समावेश होता. डॉ. खरे अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावरून या गोष्टी सांगत असत. डॉ. खरे यांची ही सवय महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना अजिबात आवडत नव्हती. अशा स्थितीत महात्मा गांधींनी डॉ. नारायण भास्कर खरे यांना आपल्या सेवाग्राम आश्रमात बोलावून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं.
(8 AUG 1947 : गांधींसाठी का बदलला 8 ऑगस्टचा अर्थ? जिनांवर कशी केली मात; कोलकाता का पेटलं?)
महात्मा गांधींचं म्हणणं ऐकून डॉ. खरे अगदी सहज म्हणाले, "माझी सध्याची मनःस्थिती चांगली नाही, त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा मसुदा तुम्हीच लिहा." महात्मा गांधींनीदेखील राजीनाम्याचा मसुदा लिहिला आणि सहीसाठी डॉ. खरे यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ. खरे यांनी महात्मा गांधींकडून राजीनामापत्र घेऊन सही न करता आपल्या खिशात ठेवलं. महात्मा गांधी काही बोलण्यापूर्वीच डॉ. खरे तेथून निघून गेले. महात्मा गांधींनी लिहिलेलं राजीनामापत्र घेऊन डॉ. खरे नागपूरला गेले आणि ते सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलं. महात्मा गांधी स्वत: एका मुख्यमंत्र्यावर राजीनामा देण्यासाठी कसा दबाव आणत होते, असा संदेश जनतेला दिला.
सईदच्या अटकेनंतर अमृतसरमध्ये दंगलीला सुरुवात
9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास साध्या वेशातले शेकडो पोलीस अमृतसर रेल्वे स्टेशनभोवती तळ ठोकून होते. एक धिप्पाड पठाण रेल्वे स्टेशनमधून बाहेर आला. पोलिसांनी त्याला अटक केली. अमृतसर रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आलेला मोहम्मद सईद हा मुस्लिम लीगचा कट्टर पठाण कार्यकर्ता असल्याचं उघड झालं. हत्याकांड घडवून आणण्यात सईदचं नाव कुप्रसिद्ध होतं.
मुस्लिम दंगलखोरांना सईदच्या अटकेची माहिती मिळताच ते संतापले. त्यांनी दुपारपासूनच शीख आणि हिंदूंच्या घरांना व दुकानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत दंगल जिल्हाभर पसरली. अमृतसरजवळच्या जबलफाड गावात 100 हून अधिक हिंदू आणि शीखांची हत्या करण्यात आली. यानंतर सुमारे एक हजार मुस्लिम दंगलखोरांनी धापई गावावर हल्ला केला. तिथे शीखांनी जोरदार प्रतिकार केला. त्यांनी अनेक मुस्लिम दंगेखोरांना मारलं.
गाझीपूर गावातही असाच प्रतिकार झाला. तिथे 14 मुस्लिम दंगलखोर मारले गेले. दंगलीतली वाढती क्रूरता पाहून मेजर जनरल टी. डब्ल्यू. रीस यांनी कारवाई केली. मुस्लिम नॅशनल गार्डचे दंगलखोरही त्यांच्याशीदेखील भिडले. संध्याकाळपर्यंत मुस्लिम लीगचे नॅशनल गार्ड आणि लष्कर यांच्यात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या दंगलींची बातमी लाहोरमध्ये बसलेल्या पंजाबचे राज्यपाल इव्हॉन मेरेडिथ जेनरिक्स यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी संपूर्ण पंजाब प्रांतात प्रेस सेन्सॉरशिपचा आदेश जारी केला, जेणेकरून 9 ऑगस्टला अमृतसर आणि आजूबाजूच्या भागात झालेल्या भीषण रक्तपाताची बातमी दुसऱ्या दिवशी पंजाबच्या कोणत्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार नाही.