मंडल यात्रेचा पहिला टप्पा विदर्भातील ११ जिल्ह्यात असेल. या यात्रेच्या शुभारंभावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मुख्य प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सरचिटणीस आमदार रोहित पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
५२ दिवसांची ‘मंडल यात्रा’
आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. इंग्रजांना देशातून घालवण्याची प्रभावी चळवळ ९ ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. असा हा ऐतिहासिक दिवस आहे. याच ऐतिहासिक दिवशी आपले सहकारी राज राजापूरकर यांनी ओबीसी मंडल यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांतून ३५८ तालुक्यांत जाणार आहे. ही यात्रा १४७७३ किलोमीटरचा प्रवास करणार आहे, असे नागपूरच्या भाषणात शरद पवार यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पक्षात आलेली मरगळ दूट झटकण्यास या यात्रेची मोठी मदत होईल.
advertisement
राष्ट्रवादीने ‘मंडल यात्रा’ का काढली आहे?
देशात मंडल आयोग लागू करण्याविरोधात भूमिका घेत भाजपाने कमंडल यात्रा काढली, परंतु देशात पहिल्यांदा मंडल आयोग लागू करण्याचे काम मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी केले. पण सध्या ओबीसींना घाबरवण्याचे काम सुरू असून भाजपाचा खरा चेहरा लोकांपुढे आणण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्यावतीने राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’ काढण्यात आली आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
पुढील ४० दिवस राज्यातील प्रत्येक जिल्ह्या तालुक्यात ही यात्रा जाईल. या प्रत्येक ठिकाणी ‘मंडल यात्रे’चं स्वागत करण्याची आणि या यात्रेच्या माध्यमातून आपल्या पक्षाची भूमिका, भाजपला ओबीसींबाबत असलेला राजकीय पुळका कसा पोकळ आहे आणि त्याचा कसा राजकीय फायदा उठवला जातो हे लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आपल्या प्रत्येकाची आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
मंडल यात्रेतून सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार: शशिकांत शिंदे
पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मंडल यात्रेविषयी म्हणाले, "आम्ही सर्व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही सुरुवात आहे. विदर्भ हा आधीपासूनच राष्ट्रवादीच्या विचारांचा राहिला आहे. सध्या केंद्र आणि राज्यातही सत्तांतर झाले आहे. त्यानंतरही विदर्भ राष्ट्रवादी विचारांच्या पाठीमागे उभा राहिला आहे. लोकसभा निवडणूकीत ते दिसून आले आहे. आज अनेक पक्षाचे लोक सोडून गेले तरी नवीन कार्यकर्ते नवीन पक्ष उभारणी करणार आहे. आम्ही पुरोगामी महाराष्ट्राची ओळख या माध्यमातून दाखवणार आहोत. ओबीसी समाजासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी राज्यात आदरणीय शरद पवार साहेब यांनीच सुरू केली होती. सध्या राज्यात वेगवेगळे भाषावाद आणि जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या मंडल यात्रेतून समाजातील शेवटच्या व्यक्तीलाही आम्ही राज्यातील सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार"