सोनिया गांधींनी आपल्या 'राजीव' या पुस्तकात काही गोष्टी लिहिल्या आहेत. त्यातल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी रात्री इंदिरा गांधी दिल्लीला परतल्या तेव्हा त्या खूप थकलेल्या होत्या. त्या रात्रभर झोपल्यादेखील नव्हत्या. समोरच्या खोलीत झोपलेल्या सोनिया पहाटे चार वाजता उठून दम्याचं औषध घेण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या होत्या. त्या वेळी इंदिरा जाग्याच होत्या. त्यांनी स्वत: सोनिया यांना औषध शोधण्यात मदत केली होती. काही त्रास झाला तर मी जागीच आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.
advertisement
31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजताच त्या तयार झाल्या होत्या. त्यादिवशी त्यांनी केशरी रंगाची आणि काळी बॉर्डर असलेली साडी नेसली होती. सर्वांत अगोदर त्या पीटर उस्तिनोव्ह यांना भेटणार होत्या. उस्तिनोव्ह इंदिरा गांधींवर एक माहितीपट बनवत होते. दुपारी ब्रिटनचे माजी पंतप्रधान जेम्स कॅलाघन आणि मिझोराममधल्या एका नेत्याला त्या भेटणार होत्या. संध्याकाळी ब्रिटनच्या प्रिन्सेस ऍन यांच्यासाठी मेजवानीचं आयोजन केलं जाणार होतं.
त्या दिवशी इंदिरा यांनी सकाळच्या नाश्तात दोन टोस्ट, मोड आलेली कडधान्यं, संत्र्याचा रस आणि अंडी खाल्ली होती. त्यानंतर मेकअप करत असतानाच त्यांचे डॉक्टर केपी माथूर तिथे आले होते. दोघांनी काही काळ चर्चा देखील केली. 9 वाजून 10 मिनिटांनी इंदिरा घराबाहेर पडल्या होत्या. उन्हापासून त्यांचा बचाव करण्यासाठी कॉन्स्टेबल नारायण सिंह काळी छत्री घेऊन त्यांच्या शेजारी चालत होते. आरके धवन त्यांच्यापासून काही पावलं मागे होते आणि त्यांच्या मागे इंदिरा गांधींचे सेवक नाथू राम होते.
त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी सब इन्स्पेक्टर रामेश्वर दयाल सर्वांत मागे होते. इंदिरा गांधी अकबर रोडला जोडणाऱ्या विकेट गेटवर पोहोचल्या तेव्हा त्या धवन यांच्याशी बोलत होत्या. अचानक तिथे तैनात असलेला सुरक्षा कर्मचारी बेअंत सिंगने रिव्हॉल्व्हर काढून इंदिरा गांधींवर गोळीबार केला. त्यांच्या पोटात गोळी लागली होती. नंतर बेअंतने पॉइंट ब्लँक रेंजमधून आणखी दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या काखेत, छातीत आणि कमरेमध्ये घुसल्या. तिथून पाच फूट अंतरावर सतवंत सिंग टॉमसन ऑटोमॅटिक कार्बाइनसह उभा होता. बेअंतच्या सांगण्यावरून त्यानेदेखील ताबडतोब बंदुकीतल्या सर्व पंचवीस गोळ्या इंदिरा यांच्या दिशेने फायर केल्या.
हे सगळं अचानक घडल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला. अशा स्थितीत सोनिया गांधी आणि इतरांनी इंदिरा यांना सफदरजंग रोडवरच्या एम्समध्ये नेलं होतं. सर्व जण इतके गडबडले होते, की एम्समध्ये याबाबत पूर्वसूचना देण्यासाठी कोणी फोनही केला नव्हता. ड्युटीवरच्या डॉक्टरांनी निरोप दिल्यानंतर काही मिनिटांतच डॉ. गुलेरिया, डॉ. एम. एम. कपूर आणि डॉ. एस. बलराम तिथे पोहोचले होते. इंदिरांना 80 बाटल्या रक्त देण्यात आलं होतं. इंदिरा गांधींना सुमारे चार तासांनी म्हणजे 2 वाजून 23 मिनिटांनी मृत घोषित करण्यात आलं; मात्र सरकारी प्रसारमाध्यमांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत याची घोषणा केली नव्हती.
इंदिरा गांधींचं चरित्र लिहिणारे इंदर मल्होत्रा म्हणतात, की इंदिरा गांधींवर असा हल्ला होण्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली होती. त्यांनी सर्व शीख सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानातून हटवण्याची शिफारस केली होती.